एकाच दिवसात दीड हजार ठिकाणी होणार रक्तदान शिबिर

पुणे, दि. 8 – भारतात दरवर्षी दीड कोटींपेक्षा अधिक नागरिकांना रक्ताची गरज असते. परंतु सुमारे 20 लाख नागरिक रक्ता पासून वंचित राहतात. 65 कोटी युवक असणाऱ्या आपल्या देशामध्ये स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांची संख्या एक कोटी पेक्षाही कमी कमी आहे. कोरोना च्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा अधिक जाणवत आहे. अशावेळी आपली जबाबदारी लक्षात घेऊन युवाहित संस्था आणि नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड अॅक्टिविस्त म्हणजेच निफा या संघटनेने पुढाकार घेतला असून या संस्थेच्या माध्यमातून 23 मार्च या शहीद दिनी संपूर्ण देशामध्ये ‘संवेदना एक पहल छोटीसी’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत देशात दीड हजार ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती युवाहित संस्थेचे अध्यक्ष तसेच युवा राष्ट्रीय पुरस्कार विजेते हितेंद्र सोमाणी यांनी दिली. 

महाराष्ट्रासह  देशातील 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी संघटनेच्या  माध्यमातून  शहीद दिनी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिरामध्ये 90,000 युनिट्स रक्त संकलित करण्याचा मानस आहे अशी माहिती नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्ट अँड अॅक्टिविस्त संघटनेचे प्रमुख प्रीतम पाल सिंग पन्नू यांनी दिली. देशातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी आयोजित  या मोहिमेमध्ये नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही प्रीतम पाल सिंग पन्नू यांनी केले आहे. 

शहीद भगतसिंग यांचे  नातेवाईक अभय सिंग संधू, राजगुरू यांचे नातेवाईक सत्यशिल राजगुरू, सुखदेव यांचे नातू अनुज ठाकूर यांच्यासह  फुटबॉलपटू बायचुंग भुतिया, गायक कैलास खेर, अभिनेता सोनू सूद, ज्येष्ठ मराठी अभिनेते मोहन जोशी अशोक हांडे, गायक गुरुदास मान, अभिनेता रणदीप हुडा, चित्रपट निर्माते करण राजदान, लेखक शिव खेरा, अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियोद्धा जसलाल प्रधान आदी हिंदीसह विविध भाषेतील कलाकार आणि मान्यवरांनी या अभियानाला पाठिंबा दिला आहे. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आणि ग्लोबल हरियाणा चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनांनीही या अभियानांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: