PMP – अटल बससेवा योजनेअंतर्गत संगमवाडी ते महात्मा फुले मंडई बससेवेचे उदघाटन

पुणे, दि. ७ – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून अटल बससेवा योजनेअंतर्गत मार्ग क्रमांक एस ८ – संगमवाडी ते महात्मा फुले मंडई या बससेवेचे उदघाटन रविवारी महापौर मुरलीधर मोहोळ व भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या शुभहस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

उदघाटन समारंभास पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सोनाली लांडगे, नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेवक अभय सावंत, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, स्वारगेट आगार व्यवस्थापक राजेश कुदळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडगे, रुपेश सोरटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पीएमपीएमएल कडून हि बससेवा सुरू करण्यात आल्यामुळे संगमवाडी परिसरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, नोकरदार, महिला यांच्यासह सर्व नागरीकांना संगमवाडी ते महात्मा फुले मंडई असा प्रवास केवळ ५ रुपयात करता येणार आहे. सध्या या मार्गावर एक बस दर तासाला धावणार आहे. या बससेवेचा मार्ग संगमवाडी- पाटील इस्टेट- शिवाजी पुतळा- मनपा भवन- आप्पा बळवंत चौक- महात्मा फुले मंडई असा आहे.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, पीएमपीएमएल हि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. महानगरपालिका व पीएमपीएमएल च्या माध्यमातून सुरू केलेली ‘अटल बससेवा’ काही दिवसातच पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात लोकप्रिय झाली आहे. संगमवाडी परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.

जगदीश मुळीक म्हणाले, संगमवाडी येथून सर्वसामान्यांना परवडणारी अटल बससेवा सुरू झाल्यामुळे अत्यंत आनंद होत आहे. अटल बससेवेमुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास नक्की मदत होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून पीएमपीएमएल च्या ताफ्यात गेल्या चार वर्षांत १००० नवीन बस दाखल झालेल्या आहेत व आणखी ५०० ई बसेस लवकरच दाखल होणार आहेत.

डॉ. चेतना केरुरे म्हणाल्या, पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली पीएमपीएमएल हि संस्था प्रवाशांना केंद्रबिंदू मानून ना नफा ना तोटा या तत्वावर सेवा पुरवते. शहराच्या मध्यवर्ती भागात ९ मार्गांवर व डेपो स्तरावरती ५३ मार्गांवर अटल बससेवेच्या माध्यमातून सेवा दिली जाते. भविष्यात दैनंदिन पासाची आकर्षक योजना देखील आणण्याचा आमचा मानस आहे.

पुणे शहर भाजप सरचिटणीस हरिष निकम यांनी संगमवाडी ते खडकी व संगमवाडी ते येरवडा या दोन मार्गांवरती अटल बससेवेच्या माध्यमातून बस सुरू करावी अशी मागणी केली.
पुणे मनपा वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य संदिप काळे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर गव्हाणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: