fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

मराठी आणि कानडी यांना एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी केले – शरद पवार

पुणे, दि. ६ – ” पं. भीमसेन जोशी हे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. राजकारणात असताना अनेकदा मराठी कानडी वाद समोर येतात. मात्र संगीतात हा वाद मिटवून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी करून दाखवीली आहे. पंडितजींनी कायमच संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा केली आहे,” अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी दि. ४ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून त्या निमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि. ६ व ७ फेब्रुवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे सुरु असून कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी डिझाईन केलेल्या विशेष ‘मोनोग्राम’चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पंडितजींचे सुपुत्र व मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, “कोरोनाचे संकट नसते तर आज हा जन्मशताब्दी कार्यक्रम आपल्याला आगळ्यावेगळ्या स्वरुपात बघायला मिळाला असता. पंडीतजीविषयी आपण सर्वांनाच आस्था आहे. त्यांनी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या माध्यमातून नवीन कलाकारांना नेहमीच प्रोत्साहित केले. ती परंपरा आजही कायम आहे याचा आनंद वाटतो. जोवर संगीतप्रेमी आहेत तोवर पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर या दोन भारतरत्नांचे नाव कायमच घेतले जाईल. त्यांचे स्वर कायमच लोकांच्या मनात राहतील. ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी पंडितजींची मैफल ऐकण्याची संधी काही वेळा मिळाली. तसेच एकदा आमच्या निवासस्थानी देखील हा योग जुळून आला होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ओलावा कायमच जाणवत असे. ज्यावेळी दूरदर्शन नव्हते त्यावेळी रेडीओच्या माध्यमातून ते घराघरात पोहचले. गीतरामायण सुरु व्हायचे तेंव्हा रस्ते ओस पडत. तसेच पंडीतजींची अभंगवाणी सुरु होत तेंव्हा घरातले सगळे हातातली कामे सोडून रेडीओ भोवती गोळा झालेली असल्याचे चित्र असे. त्यांचे संगीतातील योगदान यातून प्रेरणा घेऊन नवीन पिढी घडविण्यासाठी काही उपक्रम करण्याचे काम कोरोना काळ संपल्यावर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.”

पंडितजी आयुष्यभर संगीतसेवेसाठीच जगले असे सांगत सहस्रबुद्धे म्हणाले, “पंडीतजींनी शास्त्रीय संगीताचे व्याकरण सांभाळत सर्वसामान्यांना समजेल, आवडेल अशा पद्धतीने ते त्यांच्यापर्यंत पोहचविले. ते प्रयोगशील असून त्यांनी संगीताची सात्विकता कायम जपली. त्यांनी घराणेशाही कधी जुमानली नाही. त्यांनी अभंगवाणीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताशी सामन्यांची मैत्री करून रसिकांच्या मनात स्वतःचे अढळस्थान निर्माण केले व संगीताविषयी प्रेम जागविले. त्यांनी भारताची परदेशात वेगळी ओळख निर्माण केली. म्हणूनच परदेशी विद्यार्थ्यांना, ज्यांना भारतात येऊन भारतीय संगीत शिकण्याची इच्छा असेल अशा परदेशी विद्यार्थ्यांसाठी रुपये दीड लाखाची ‘आंतरराष्ट्रीय स्वरभास्कर भीमसेन जोशी पाठ्यवृत्ती’ सुरु करणार आहोत. ही पाठ्यवृत्ती येत्या जून महिन्यापासून सुरु करण्याचा प्रयत्न आहे.”  

जावडेकर म्हणाले, “पंडितजी म्हणजे संगीतातील अखेरचा शब्द. त्यांनी तानसेनांबरोबर कानसेनही घडविण्याचे काम केले. त्यांच्या रामबाग कॉलनीतील घराजवळ मी राहत असल्याने २-४ वेळा त्यांचा रियाज ऐकण्याचे भाग्य लाभले. त्या देशात कलेचा सन्मान होतो तो देश पुढे जातो. त्यांना मिळालेला भारतरत्न म्हणजे संगीताचा सर्वोच्च सन्मान आहे. कलाकारांचा सन्मान म्हणजे देशाची मन उंचाविण्याचा टप्पा असतो. त्यांचा तसेच अनेक मान्यवरांचा जो खजिना दूरदर्शन व आकाशवाणीकडे आहे तो रसिकांना सहज उपलब्ध होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. आकाशवाणीचे राष्ट्रीयस्तरावरील संगीत संमेलन या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने यापुढे भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत संमेलन म्हणून सदर करण्यात येईल.”

उद्घाटन सोहळ्यानंतर पंडितजींचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने पहिल्या सत्रातील सांगीतिक मैफलीची सुरुवात झाली. पंडित भीमसेन जोशी यांच्या आवडीच्या राग पुरीया या सायंकाळच्या रागाने त्यांनी गायनाला सुरूवात केली.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading