कामगार पुतळा परिसरातील मेट्रोबाधितांचे योग्य पुर्नवसन करा -पतित पावन संघटनेचे पुणे महापालिकेसमोर आंदोलन

पुणे, दि. 2 – आम्हा मेट्रोबाधितांना घराला घर मिळालेच पाहिजे…३ किमीच्या अंतरावरच घर मिळावे…मुलांच्या शिक्षणाचा विचार व्हावा… हातावर पोट असलेल्यांना न्याय द्या…शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे घर मिळावे… अशा घोषणा देत पतित पावन संघटना पुणे शहर आणि राजीव गांधीनगर, कामगार पुतळा, जुना तोफखाना व आजूबाजूच्या परिसरातील मेट्रोबाधितांनी पुणे महापालिकेसमोर आंदोलन केले. 

यावेळी पतित पावन संघटनेचे राजाभाऊ पाटील, शिवाजीराव चव्हाण, स्वप्नील नाईक, दिनेश भिलारे, श्रीकांत शिळीमकर, धनंजय क्षीरसागर, मनोज नायर, गुरु कोळी, संतोष शेंडगे, गोकुळ शेलार, विजय गावडे, विक्रम मराठे, पप्पु टेमगिरे, मनोज पवार, विश्वास मनेरे, अरविंद परदेशी, विनोद चौधरी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेच्यावतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांना निवेदन देण्यात आले. 
स्वप्नील नाईक म्हणाले, राजीव गांधीनगर, कामगार पुतळा, जुना तोफखाना व आजूबाजूच्या परिसरात मेट्रोचे काम सुरु आहे. यामुळे स्थानिक रहिवासी प्रभावित होत आहे. येथील रहिवाशांना सुधारित नियमाप्रमाणे तीन किलोमीटरच्या आत शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे घरे मिळायला हवीत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार देखील व्हायला हवा. 
धनजंय क्षीरसागर म्हणाले, मेट्रोमुळे बाधित असलेले बहुतांश हातावर पोट असणारे नागरिक आहेत. त्यामुळे मेट्रोच्या कायद्यामुळे त्यांना घराला घर मिळायला हवे. शक्य असेल तर जागेवरच पुर्नवसन करुन मिळावे. यामध्ये महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून कष्टकरी वर्गास न्याय मिळवून द्यावा, याकरीता आम्ही आंदोलन करीत आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: