नवनीत एज्युकेशन आता ‘नवनीत डिजिबुक’ स्वरूपात

पुणे, दि. 2 – नवनीत एज्युकेशन लिमिटेड या शैक्षणिक साहित्य निर्मिती करणारा ब्रॅंड आता ‘नवनीत डिजिबुक’ स्वरूपात उपलब्ध झाला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना नावनीतचे शैक्षणिक साहित्य ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. नवनीतने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांची स्मार्ट आणि डिजिटल आवृत्ती डिजिबुक अॅप त्याचप्रमाणे वेब-आधारित प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

या नवनीत डिजिबुकमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या स्क्रीनवर पुस्तके पाहता येणार आहेत; त्याचबरोबर चित्रे झूम करून पाहणे, नोंदी (स्टिकी नोट्स) जोडणे, ड्रॉइंग टूल्सचा वापर करून मजकुरावर खुणा करणे आणि मित्रमैत्रिणींना डेटा पाठवणे यांसारख्या अनेक सुविधांचाही लाभ घेता येईल. परस्परसंवादी अभ्यास, अॅनिमेशन, मजकूर हायलाईट करणे व जोडणे आणि मोठ्याने वाचन करणे यांसारख्या खास वैशिष्ट्यांमुळे अभ्यास रंजक होणार आहे. सर्वप्रथम नवनीतचा सर्वात लोकप्रिय ‘21 अपेक्षित प्रश्नसंच (21 एमएलक्यू)’ डिजिबुकच्या अॅप / वेबसाइटवर लॉन्च करण्यात आला. परंतु आता गाइड्स, राइझ सिरिज (सीबीएसइ),प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक वर्गाची पुस्तकेसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. लॉन्च ऑफर म्हणून, 21 अपेक्षितची छापील पुस्तके खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी नवनीत डिजिबुक विनामूल्य देण्यात येणार आहे. पुस्तकावर छापलेल्या अ‍ॅक्सेस कोडच्या साहाय्याने विद्यार्थी या डिजिबुकचा वापर करू शकतात.

नवनीत एज्युकेशनचे ब्रँडिंग प्रमुख देविश गाला म्हणाले, “शिक्षणाच्या पारंपरिक पद्धती बदलताना भविष्यातील शैक्षणिक साधने आणि शिक्षणाची पद्धत या दोन्हींच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची एजुटेक / एजटॅककडे क्षमता आहे; त्याचबरोबर पारंपरिक शिक्षणपद्धतींचे मूलभूत फायदे विचारात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. डिजिटल माध्यम व छापील पुस्तके या दोहोंचा सुयोग्य संगम झाल्यास विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढेल आणि त्यांना अभ्यासाचा आनंदही मिळवता येईल. डिजिटल माध्यमातून अभ्यास करणे जसे सुलभ व अधिक मनोरंजक होईल, तसे छापील पुस्तकांची वेळोवेळी मिळणारी साथ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल.”

Leave a Reply

%d bloggers like this: