‘मी गातो माझे गाणे’ मधून शब्द -अर्थ वैविध्याची स्वरमैफल

पुणे, दि. 2 – स्त्री भ्रूण हत्येच्या विषयात जनमानसात सकारात्मकता जागविण्यापासून स्वत:मधील सामर्थ्य ओळखण्यापर्यंतचा प्रवास गीतांद्वारे रसिकांसमोर उलगडण्यात आला. एक शायर जन्माला येण्यासाठी काय लागते, हे सांगणारे वैशिष्टयपूर्ण गीत सादर करुन शब्द आणि त्याच्या अर्थामधील वैविध्य पुणेकरांनी अनोख्या अशा आरव पुणे निर्मित मी गातो माझे गाणे या स्वरमैफलीतून अनुभविले. 

निमित्त होते, युवा संगीतकार निखील महामुनी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि डॉ.माधुरी चव्हाण-जोशी लिखित गीत सादरीकरण कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात निखील महामुनी, ॠचा महामुनी, डॉ.माधुरी चव्हाण-जोशी यांनी गीते सादर केली. तर, अनिल आठलेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 
मैफलीची सुरुवात निखील महामुनी यांनी ‘मी गातो माझे गाणे’ या भावलेल्या कवितांच्या रचनांचा कार्यक्रम असलेल्या प्रमुख गीताने केली. डॉ.माधुरी जोशी-चव्हाण यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना निखील महामुनी यांनी चढविलेला स्वरसाज रसिकांच्या पसंतीस उतरला. प्रत्येकाला परमेश्वराने जे दिले आहे, ते ओळखा. कोणालाही कमी लेखू नका, असा अर्थ सांगणारी बाभळीची देहजाळी चंदनाला सांगते… ही रचना उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली. 

स्त्री भ्रूण हत्येसारखा विषय गीतातून मांडताना केवळ व्यथा नको, तर त्यातील सकारात्मकता मांडू या उद््देशाने ॠचा महामुनी हिने सादर केलेले काळीज का हो… या गीताला रसिकांची उत्तम दाद मिळाली. एक शायर जन्माला यायला काय हवे असते, हे सांगणारी कहाण्या काही उशाला… आणि गोठलेल्या काळजाच्या पार झाली पाहिजे… या गीतांच्या सादरीकरणाच्या वेळी रसिकांनी ताल धरला. स्वरमैफलीचा समारोप श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा धागा उलगणारे कथा काव्य कृष्ण सुदामा या रचनेने झाला. या रचनेला रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात दाद दिली. मैफलीपूर्वी डॉ.माधुरी चव्हाण-जोशी यांच्या मधुघट या पहिल्या गझलसंग्रहाचे प्रकाशन देखील झाले

Leave a Reply

%d bloggers like this: