श्रीराम पथकातर्फे अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ लाख ५५ हजार

पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर टाकणा-या ढोल-ताशा पथकांपैकी एक पुण्यातील श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट – ढोल, ताशा पथकातर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे निधी समर्पण करण्यात आले. पुण्यातील एक ढोल-ताशा पथक एवढया मोठया स्वरुपात निधी समर्पण करीत असल्याची बहुतेक पहिलीच घटना असल्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी वादकांचे कौतुक केले. 

श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट- ढोल, ताशा पथक व मित्र परिवारतर्फे शनिवार पेठेतील पेशवेकालीन जोशी श्रीराम मंदिरात आयोजित कार्यक्रमात हे निधी समर्पण करण्यात आले. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे, रा.स्व.संघ पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, कसबा भागाचे संघचालक अ‍ॅड.प्रशांत यादव, मोतिबाग नगराचे संघचालक अ‍ॅड. शरद चंद्रचूड, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेविका अ‍ॅड.गायत्री खडके, जोशी श्रीराम मंदिराचे किशोर जोशी उपस्थित होते. श्रीराम पथक ट्रस्टचे अध्यक्ष विलास शिगवण, महेश शेठ, राहुल बोरा, प्रसाद लावगणकर, अश्विन देवळणकर, ओंकार टिळेकर आदींनी हा निधी मान्यवरांकडे सुपूर्द केला. 
डॉ.शरद कुंटे म्हणाले, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या रुपाने अपमान धुवून काढण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. देशाचा इतिहास बदलणारी ही घटना आहे. श्रीराम हे केवळ नाम नसून विचार आणि श्रद्धा आहे. त्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. मंदिर निर्मितीच्या कार्यामुळे देशभक्ती आणि हिंदुत्वाची शक्ती निर्माण होणार आहे. 

अ‍ॅड.प्रशांत यादव म्हणाले, देशबांधवांमध्ये अनुशासन, शिस्त व संघटीतपणा टिकून राहिला असता, तर आपण गुलामगिरीत गेलो नसतो. अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण झाल्यानंतर भारतातीलच नव्हे, तर परदेशातील अनेक विद्यार्थी याचा इतिहास जाणून घेण्यासाठी अभ्यास करतील. तसेच पर्यटक देखील मोठया संख्येने येतील, हे अभिमानास्पद आहे. जागतिक पातळीवर श्रीराम मंदिराकडे भारताचे सांस्कृतिक केंद्र म्हणून पाहिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र आठवले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: