पत्रकारितेतील ‘न्यू नॉर्मल’ साठी सतत अद्ययावत राहावे – आनंद आगाशे

पुणे, दि. १ – ‘डिजिटल माध्यमांसाठी तंत्रज्ञान सतत वेगाने बदलत असल्याने, ‘ न्यू नॉर्मल ‘ परिस्थिती समजून घेण्यासाठी पत्रकारांनी ज्ञान सतत अद्ययावत करण्याची गरज आहे, ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी केले.

पत्रकार विश्वनाथ गरूड लिखित, गमभन प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘ डिजिटल पत्रकारिता ‘, ‘ डिजिटल पत्रकारिता आणि एसईओ’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

आनंद आगाशे, प्रकाशक ल. म.कडू, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रमोशन तज्ज्ञ स्वप्नील नरके यांच्या हस्ते पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे हा प्रकाशन सोहळा झाला.

आनंद आगाशे म्हणाले, ‘ जगाबरोबर वृत्तपत्रसृष्टी , डिजीटल मीडिया सतत बदलत आहे. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आजचे न्यू नॉर्मल उद्या नॉर्मल होत आहे, आणि नवे न्यू नॉर्मल समोर येत आहे. अशा वेळी पत्रकारांनी तंत्र स्नेही राहून सतत अद्ययावत राहिले पाहिजे. डिजीटल पत्रकारितेवर रंजक प्रकारे तांत्रिक माहिती देणारी अशा प्रकारची पुस्तके पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात असली पाहिजेत.

तंत्रज्ञानाच्या दृष्टीने वर्तमानातील गोष्टी आणि भविष्यातील बदल होत करु पत्रकारांना कळण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, असेही आगाशे यांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल मीडियाचे तज्ज्ञ स्वप्नील नरके म्हणाले, ‘ डिजीटल मार्केटिंग मध्ये सर्च इंजिन ऑप्टीमायझेन, सर्च इंजिन मार्केटिंग या गोष्टी येतात. प्रत्येक व्यवसायाला प्रमोशन साठी कोणते डिजीटल तंत्र उपयोगी पडेल याचा अचूक अंदाज असला पाहिजे. मात्र, पारंपारिक माध्यमातून प्रमोशन करण्यापेक्षा डिजीटल मीडियातून प्रमोशनद्वारे व्यवसायाची माहिती सर्वदूर पोहोचविता येण्यासाठी उपयोगी ठरते. ग्राहक ही माहिती पाहतो का, वाचतो का, याची माहिती आपल्याला मिळू शकते. याबाबत इंग्रजीत बरेच ज्ञान उपलब्ध असले, तरी मराठीत ते या दोन पुस्तकाद्वारे आली, ही महत्वाची गोष्ट आहे.

लेखक विश्वनाथ गरुड म्हणाले, ‘न्यूज वेबसाईट करताना संकल्पना नावीन्यपूर्ण लागते.केवळ सोशल मिडिया प्रमोशन करुन उपयोग नसतो. अॅग्रीगेटरशी भागीदारी करणेही फायदेशीर ठरत नाही.गुगलवर वेबसाईट दिसण्यासाठी ऑप्टिमायझेशन केले पाहिजे. त्याबद्दल या पुस्तकात माहिती दिलेली आहे. वाचक मिळविण्यासाठी, न्यूज वेबसाईटद्वारे व्यवसाय मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या प्रयत्नांची गरज असते, त्यासाठी सर्व तंत्र समजून घेतले पाहिजे. राजकीय पक्षांच्या समर्थनासाठी कार्यरत वेब साईटमध्ये काम करून फार उपयोग नसतो, कारण या वेबसाईट टिकत नाहीत.

सागर गोखले यांनी सूत्रसंचालन केले. आशीष चांदोरकर यांनी आभार मानले. नगरसेवक धीरज घाटे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: