भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘अभिवादन’ या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका आता उपलब्ध होणार

पुणे, दि. ३१ – भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिवादन’ या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका आता उपलब्ध होणार आहेत. प्रत्येकी दोन प्रवेशिका देण्यात येणार असून त्या बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व सहकारनगरमधील भीमसेन जोशी कलादालन येथे उपलब्ध होणार आहेत. हा कार्यक्रम करोना काळातील सरकारी सूचनांनुसार होणार असल्याने, प्रवेश संख्येवर मर्यादा असेल.  हा संपूर्ण कार्यक्रम विनाशुल्क असला, तरीही त्यासाठीच्या प्रवेशिका आधी घेणे आवश्यक आहे, अशी सूचना मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.  

‘अभिवादन’ हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असून भीमसेनजींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. ६ रोजी दुपारी चार वाजता होईल. त्यानंतर भीमसेनजींचे शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे यांचे गायन होईल. प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांच्या वादनाने या सत्राचा समारोप होईल.

रविवार दि. ७ रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणाऱया दुसऱया सत्रात पंडितजींचे शिष्य व चिरंजीव श्रीनिवास जोशी व ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे गायन होईल. याच सत्रात भीमसेनजींच्या कर्तृत्वाबद्दल होणाऱया चर्चेत ज्येष्ठ नाट्य व चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, प्रा. सदानंद मोरे, अच्युत गोडबोले व श्रीरंग गोडबोले सहभागी होणार आहेत.

रविवारी दुपारी चार वाजता सुरू होणाऱया तिसऱया सत्रात भीमसेनजींचे नातू विराज जोशी, प्रसिद्ध कलावंत कौशिकी चक्रवर्ती व किराणा घराण्याच्या ज्येष्ट गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन होईल. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे निर्माण करण्यात आलेल्या पंडितजींवरील लघुपटही याच सत्रात दाखवण्यात येणार आहे.

दरम्यान, भीमसेनजींच्या जन्मदिनी म्हणजे गुरुवार दि. ४ फेब्रुवारी रोजी आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या सवाई गंधर्व स्मारकात पंडितजींच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. पंडितजींच्या निस्सीम चाहत्यांना त्या ठिकाणी येऊन आपल्या भावना व्यक्त करता येतील. सकाळी साडेनऊ पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रसिकांना या ठिकाणी येता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: