Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

साहित्य संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व नाशिककरांची – छगन भुजबळ

नाशिक दि, 31 – नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हावा; नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय व्हावे यासाठी माझ्यासह नाशिकच्या प्रत्येक नागरीकाने स्वागताध्यक्षाच्या भूमिकेतून संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने गोखले एज्युकेशन सोसायटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी छगन भुजबळ बोलत होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, महापालिकेचे अपर आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपायुक्त मनोज घोडे पाटील, डॉ.मो.सो.गोसावी, चंद्रकांत महामीने, जयप्रकाश जतेगावकर, शंकर बोऱ्हाडे, डॉ.कैलास कमोद, वसंत खैरनार, श्रीकांत बेनी,दत्ता पाटील, विनायक रानडे, नगरसेवक शाहू खैरे, गजानन शेलार, रंजन ठाकरे, लक्ष्मण सावजी, दिलीप खैरे यांच्यासह नाशिक शहरातील मान्यवर उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देशभरातून साहित्यिक येणार आहेत. याचे सगळे नियोजन करण्याची जबाबदारी स्वागतध्यक्ष म्हणून व एक नाशिककर म्हणून मी पार पाडणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनस्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ म्हणून नामकरण केले असल्याचे, भुजबळ यांनी यावेळी जाहीर केले.

घरोघरी उभारा सहभागाची, सन्मानाची गुढी

संमेलनाचा उत्साह आणि आनंद हा केवळ साहित्य संमेलनाचे आयोजन असलेल्या वास्तूभोवती न राहता संपूर्ण शहरात त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे. यासाठी प्रत्येक नाशिककराने संमेलन काळात आपल्या घरावर या सन्मानाची आणि साहित्य सोहळ्याची गुढी उभारावी. जेणेकरून या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या शहरात आलेल्या साहित्यिक आणि मान्यवरांच्या मनावर प्रभाव पडेल की, प्रत्येक नाशिककर या सोहळ्यात तितक्यात तन्मयतेने सहभागी झाला आहे, असेही .भुजबळ यांनी सांगितले.

या संमेलनास शासनामार्फत 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार निधी मधूनही मदत दिली जाणार आहे. येत्या 50 दिवसांत सूक्ष्म नियोजन करुन संमेलनाची परिपूर्ण नियोजन करण्यात यावे. तसेच संमेलनासाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या लवकरात लवकर गठीत करण्याची सूचनाही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी आयोजकांना केली.

संमेलनाच्या काटेकोर नियोजनासाठी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महानगरपालिका, महावितरण आदी विभागांतील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच संमेलनाच्या अनुषंगाने आलेल्या सूचनावंरही योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

नाशिकमध्ये होणारे संमेलन वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येईल. तसेच यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे  आवाहनही .भुजबळ यांनी केले.  कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नसल्याने संमेलन काळात कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जावे. तसेच त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याची सूचना भुजबळ यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading