दीड वर्षानंतर मिळणार सशांना ‘मोकळा श्वास’

पुणे, दि.२९ – सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीमध्ये पिंजऱ्यात डांबून ठेवलेल्या सशांना दीड वर्षांनंतर आता मोकळा श्वास घेता येणार आहे. तसेच मासे जलस्रोतामध्ये सोडण्यात येणार आहेत. आदिनाथ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पाळलेल्या या सशांचे व माशांचे हाल होताना पाहून प्राणीप्रेमी जीवसेवा फाउंडेशनचे अमित शहा यांनी आधी पोलिसांत धाव घेऊन त्यावेळचे चेअरमन महेंद्र जैन व सचिव राहुल विलास मेहता यांच्यावर गुन्हा दाखल केला.  त्यानंतर ससे व मासे यांच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुणे यांनी यावर सुनावणी करत सशांना दत्तक देण्याचे, तर माशांना नैसर्गिक जलाशयात सोडण्याचे अंतरिम आदेश दिले. त्यानुसार जीवसेवा फाउंडेशनकडून या सशांना दत्तक घेण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात येत आहे.

याबाबत फाउंडेशनचे अध्यक्ष अमित शहा यांनी माहिती दिली. अमित शहा म्हणाले, “दीड वर्षांपूर्वी आदिनाथ सोसायटीच्या गार्डनमध्ये फिरत असताना मला एका कोपऱ्यात उघड्यावर लोखंडी जाळीच्या पिंजऱ्यात अंदाजे ५०-६० ससे दिसले. पावसाचे दिवस असल्याने ते भिजत होते. त्यांना खाद्यही दिले नसल्याचे दिसले. यासह शेजारीच विशीष्ट प्रजातीचे मासे पालन केल्याचेही दिसले. त्यांनाही खाद्य व ऑक्सिजन दिल्याचे दिसून आले नाही. याबाबत चौकशी केली असता, हे ससे व मासे सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांच्या अधिपत्याखाली असल्याचे आणि ते मुलांचे, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी पालन केल्याचे समजले. त्यामुळे प्राणी संरक्षण कायद्यानुसार, या सशांची व माशांची योग्यप्रकारे देखभाल होत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावेळेसचे चेअरमन महेंद्र जैन, सेक्रेटरी राहुल विलास मेहता यांच्याविरोधात मी पोलिसात तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहिता, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अनिमेशन ऍक्ट १९६० व वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट १९७२ नुसार गुन्हा दाखल केला.”

“हे प्रकरण पुणे न्यायालयात गेले. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत या सशांचा ताबा जीवसेवा फाउंडेशनकडे द्यावा, तसेच पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. माशांना नैसर्गिक जलस्रोतामध्ये सोडण्यात यावे, असे नमूद केले आहे. सध्या हे ससे जीवसेवा फाऊंडेशनकडे सोपविण्यात आले आहे. ही संस्था त्यांची देखभाल करते आहे. नियमानुसार एखादी व्यक्ती २-३ ससे पाळू शकते. या सशांची चांगली देखभाल व्हावी आणि त्यांना हक्काचे पालक मिळावे याकरीता उपलब्ध असलेले ससे दत्तक घेण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी अमित शहा (९८२२१९५०९२) यावर संपर्क करावा,” असे आवाहन अमित शहा यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: