क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांना पोवाड्यातून वंदन

पुणे, दि. २८ – सांगतो गाथा वीराची…गोष्ट लाखाची, क्रांतीवीराची… धन्य धन्य राजगुरू वीर शिवराम… आज कवनातून करतो सन्मान, लोक हो ऐका देवून तुम्ही कान हो जी जी जी … अशा तडफदार आवाजात हुतात्मा क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू यांची गाथा उलगडली. या क्रांतीवीराने अवघ्या २३ व्या वर्षी इंग्रज सरकारला हादरवून टाकले आणि इन्कलाब झिंदाबादचे नारे देत फासावर गेले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अशा महान योद्धयांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे कवन आॅनलाईन माध्यमातून सादर झाले. 

गुरूवार पेठेतील वीर शिवराय मंडळाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा क्रांतीकारी शिवराम हरी राजगुरू यांच्या जीवनावर आधारीत पोवाड्याचे आॅनलाईन माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. पोवाड्याचे सादरीकरण शाहीर श्रीकांत शिर्के यांंनी केले. यावेळी शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू त्यांच्या पत्नी आरती राजगुरू, नगरसेविका आरती कोंढरे, राम बांगड, किशोर चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष किरण सोनीवाल, सभासद अंकुश दिघे, रशीद खान, राजेंद्र भोसले, शुभेंदु मोडक, प्रकाश कांबळे, रवींद्र ओव्हाळ, सतीश पतंगे, विशाल कांबळे, रौनक शेलार उपस्थित होते. यावेळी सत्यजीत राजगुरू, आरती राजगुरू, शाहीर श्रीकांत शिर्के यांचा सन्मान करण्यात आला. 
शाहीर श्रीकांत शिर्के म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत मोलाचे योगदान देण्याºया या क्रांतीकारकाचा गौरवशाली इतिहास लोकांच्या स्मरणात कायम राहीला पाहिजे. अशा महान व्यक्तींचा इतिहास आपण विसरतो ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. माझ्या कलेतून मी काय करू शकतो असा विचार केला आणि राजगुरू यांची जीवनगाथा सांगणारा हा पोवाडा लिहीला, असे ही त्यांनी सांगितले. 

किशोर चव्हाण म्हणाले, अनेकजण प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतात आणि पर्यटन स्थळाला भेट देतात. परंतु या दिवशी देशासाठी बलिदान देणाºया अशा थोर व्यक्तींचे स्मरण केले पाहिजे. अशा महान व्यक्तींच्या जन्मस्थळी जावून त्यांना वंदन केले पाहिजे आणि त्यांचा गौरवशाली इतिहास नेहमी स्मरणात ठेवला पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले. सत्यशील राजगुरू यांनी मनोगत व्यक्त केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: