मिकासिंग बनला रॅपर!

दोन परस्परविरोधी स्वभावाच्या तरूण जोडप्यात निर्माण होणारी ही प्रेमकथा अमृतसर शहराच्या पार्श्वभूमीवर घडते. त्यामुळे ‘झी टीव्ही’ वाहिनीने ‘तेरी मेरी इक जिंदरी’ या आपल्या नव्या आगामी प्रेमकथेतील नायक-नायिकांचा परिचय अमृतसरमधील एका पत्रकार परिषदेत करून दिला होता. या मालिकेचे लक्षवेधी प्रोमोज आणि माध्यमांतून तिला मिळालेल्या प्रसिध्दीमुळे बॉलीवूडचा नामवंत पॉपगायक मिकासिंग याचे लक्ष या मालिकेने वेधून घेतले होते. त्याने या मालिकेसाठी प्रथमच रॅपगीत गाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या चटपट्या रॅप गीताने या अस्सल पंजाबी आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रेमकथेला वेगळीच धार दिली आहे. मिकासिंगने आपले हे पहिले रॅप गीत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसृत केले आहे.

यासंदर्भात मिकासिंग म्हणाला, “झी टीव्हीवरील तेरी मेरी इक जिंदरी या अस्सल पंजाबी नावाच्या नव्या मालिकेने आणि त्यातील दोन परस्परविरोधी स्वभावाच्या तरूण-तरुणीत निर्माण होणार्‍्या प्रेमकथेच्या प्रोमोंनी माझं लक्ष वेधून घेतलं होतं. या वाहिनीवरील दुसर्‍्या एका मालिकेसाठी मी या वाहिनीच्या टीमबरोबर संगीत तयार करीत होतो. त्यावेळी अचानक मला या रॅप गीताची रचना उत्स्फूर्तपणे सुचली. त्यात या मालिकेच्या कथानकाचं सार आलं होतं. रॅप गीत हा सध्याच्या तरुणांचा आवडता संगीत प्रकार आहे. या रॅपमध्ये सुरेल संगीत आणि चटपटी चाल यांचं सुंदर मिश्रण झालं असून प्रेक्षकांना या मालिकेच्या कथेइतकंच हे रॅप गीतही आवडेल, अशी मी आशा करतो.”

‘झी टीव्ही’ वाहिनीशी असलेल्या आपल्या प्रदीर्घ संबंधांविषयी मिकासिंग म्हणाला, “झी के साथ मेरा बहुत पुराना रिश्ता है. मी त्यांच्याबरोबर 20 पेक्षाही अधिक मालिकांसाठी काम केलं असून त्यापैकी या वाहिनीवरील सा रे ग म प हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला आहे. आताही मी या वाहिनीवरील इंडियन प्रो-म्युझिक लीग या आगामी संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाशी जोडला गेलो आहे. त्यांच्याबरोबर काम करताना मला नेहमीच फार आनंद होतो.”

माही आणि जोगी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेला प्रेक्षकांकडून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून ते या मालिकेच्या प्रसारणाची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत. आध्विक महाजन आणि अमनदीप सिध्दू हे दोन कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारीत असून येत्या 27 जानेवारीपासून या मालिकेचे प्रसारण सुरू होईल. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.00 वाजता  ‘झी टीव्ही’वरून प्रसारित केली जाईल.

Leave a Reply

%d bloggers like this: