शाब्बास! महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २५ : ‘महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. विविध क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून आपल्या मुलांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ‘शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मुलांचे कौतुक केले आहे.

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती, समाजसेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा देशभरातील 32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुले पुरस्कार विजेते ठरले आहेत. त्यामध्ये धाडसी कामगिरीचा शौर्य पुरस्कार – कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (जि. नांदेड) याला, नवनिर्माणासाठी – श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित राहूल पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी- सोनित सिसोलेकर (पुणे), आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी – काम्या कार्तिकेयन (मुंबई) यांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर वाघमारे या चौदा वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत बुडणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता. त्याच्या या धाडसाचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यापूर्वीच कौतुक केले होते. त्याला या धाडसाबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.

अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. हेच आपल्या मुलांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून सिद्ध केले आहे. बहादुरी आणि लढवय्येपणात महाराष्ट्र मागे हटत नाही. तसाच तो नवनिर्माण आणि प्रयोगशीलतेतही पुढेच आहे. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच दिमाखदार राहिली आहे. या क्षेत्रात आपली नवी पिढीही तितक्याच उमेदीने पुढे जात आहे. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. पुरस्कारप्राप्त या मुलांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी भले, शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे, असेही म्हणावे वाटते. पुरस्कारप्राप्त या मुलांमध्ये ही जिद्द आणि चिकाटी निर्माण करणारे त्यांचे कुटुंबीय, पालक तसेच शिक्षक, मार्गदर्शकही कौतुकास पात्र आहेत. त्यासाठी या सर्वांचे आणि पुरस्कार विजेत्या मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा.

Leave a Reply

%d bloggers like this: