तुला परत मानलं रे ठाकूर! शार्दूल ठाकूरचे विराटने केले कौतुक
मुंबई – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतातील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आज भारतीय संघाने 369 धावांवर मजल मारली आहे. त्यामुळे कांगारुंना दुसऱ्या डावात केवळ 33 धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र मराठमोळा शार्दूल ठाकूर आणि कसोटी पदार्पण करणारा वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्या झुंजार अर्धशतकी खेळीने भारताचा डाव सावरला. सातव्या विकेटसाठी शार्दूल आणि वॉशिंग्टन सुंदरने एकूण 123 धावांची निर्णायक भागीदारी केली. त्यामुळे तमाम क्रिकेटप्रेमींसह अनेक खेळाडूंकडून दोघांचे कौतुक होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही ट्विटच्या माध्यमातून शार्दूल आणि सुंदरचे कौतुक केले आहे. ‘तुला परत मानलं रे ठाकूर’, अशा मराठमोळ्या शब्दांत त्याने शार्दूल ठाकूरची पाठ थोपटली आहे.
विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरचे शानदार प्रदर्शन. हा असाच असतो कसोटी सामना. वॉशी पदार्पणात सर्वोत्तम एकाग्रता आणि तुला परत मानलं रे ठाकूर.’
दरम्यान, यापूर्वी २०१९च्या डिसेंबर महिन्यात शार्दूल ठाकूरने आपल्या आक्रमक खेळीने भारताला वेस्ट इंडिज विरोधात विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. या खेळीनंतरदेखील विराटने त्याचे कौतुक केले होते. त्यावेळी शार्दूलसोबत फोटो शेअर करत तो म्हणाला होता, ‘तुला मानलं रे ठाकूर.’
