राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग पदाधिकाऱ्यांच्या चित्रिकरण स्थळांना भेटी : सुरक्षेच्या उपाययोजनांची केली पाहणी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठी मालिकांच्या चित्रिकरणस्थळांना भेट देऊन कलाकार, तंत्रज्ञांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय-काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नुकतीच करण्यात आली. चित्रिकरणादरम्यान कलाकार-तंत्रज्ञांच्या आरोग्याविषयी पूर्णपणे काळजी घेण्यात आली असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले. नाट्य कलाकारांसाठी नाट्य परिषद आहे, चित्रपट कलाकारांसाठी मराठी चित्रपट महामंडळ आहे; पण मराठी मालिकांमधील कलाकारांसाठी कुठलीही संस्था-संघटना नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकार्‍यांनी आस्थेवाईकपणे केलेल्या चौकशीबद्दल कलाकारांनी समाधान व्यक्त करीत कृतज्ञता व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात मराठी मालिकांचे चित्रिकरण सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकार-तंत्रज्ञांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौर्‍याविषयी प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली. या दौर्‍यात प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह प्रदेश समन्वयक संतोष साखरे, अभिनेते आणि सांस्कृतिक विभागाचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कोल्हापूर शहर अध्यक्ष उमेश बोळके, अभिनेते आणि पुणे शहर अध्यक्ष गिरीष परदेशी यांचा समावेश होता.

सांगली जवळ असलेल्या पटवर्धन पॅलेस परिसरात राजा राणी या मालिकेचे चित्रिकण सुरू आहे. सुमारे बारा एकराचा हा परिसर आहे. या परिसरात जाण्यायेण्यास कलाकार-तंत्रज्ञांव्यतिरिक्त कुणालाही परवानगी नाही. आमची टीम ज्या वेळी पाहणीसाठी गेली तेव्हा आमचीही तपासणी करण्यात आली. तातडीच्या उपाययोजनांसाठी येथे एका वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील कलाकार स्वत:च्या हाताने जेवण घेतात, जेवणानंतर स्वत:ची भांडी स्वत: धुतात हे विशेष.

सांगलीपासून 18 किमीवर असलेल्या जैनापूर येथील मंत्री वढावकर यांच्या फार्म हाऊसवर जीव झाला येडापिसा या मालिकेचे चित्रिकरण सुरू आहे. येथेही आरोग्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

कोल्हापूर फिल्मसिटीत ज्योतिबा या मालिकेचे चित्रिकरण सुरू असून येथे सीसीटिव्ही लावण्यात आले आहेत. दिवसभरात कोण येते-जाते याची सुरक्षारक्षकांकडून नियमितपणे माहिती घेतली जाते. आर्थिक प्रश्नामुळे कोल्हापूरमधील फिल्मसिटी बंद पडण्याच्या मार्गावर होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या फिल्मसिटीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर येथे पहिले चित्रिकरण ज्योतिबा या मालिकेचे सुरू झाले. परी या मालिकेचे चित्रिकरणही येथे सुरू होणार असून त्यासाठी सध्या सेट लावण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून सुरू असल्याचे दिसून आल्याचे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वाईपासून जवळच असलेल्या कडेगावात देवमाणूस मालिकेचे चित्रिकरण सुरू आहे. येथे सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गावातील ज्या भागात चित्रिकरण सुरू आहे तेथे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गावकर्‍यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे.

नाटकांसाठी नाट्य परिषद आहे, मराठी चित्रपटांसाठी चित्रपट महामंडळ आहे. पण मालिकांमधील कलाकारांसाठी कुठलीही संघटना, संस्था नाही. नाट्य परिषद, चित्रपट महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी अद्यापही मालिकांच्या चित्रिकरणस्थळी भेट दिलेली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकार्‍यांनी मालिकांच्या सेटवर भेट देऊन कलाकारांची आस्थेवाईकपणे चौकशी केल्याबद्दल कलाकारांनी समाधान व्यक्त केले. चित्रपट महामंडळाने भरारी पथक नेमून अचानक पाहणी करण्याचे सुतोवाच केले होते. पश्चिम महाराष्ट्रातील मालिकांच्या चित्रिकरणस्थळांना भरारी पथकाने भेटी दिल्या नसल्याचे कलाकारांनी सांगितल्याचे बाबासाहेब पाटील यांनी नमुद केले.

श्रेष्ठींनी आदेश दिल्यास चित्रपट महामंडळाची निवडणूक लढविणार

सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने पावले उचलली आहेत. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून दरूचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये काम करणार्‍या कलाकारांना कशा पद्धतीने सामावून घेता येईल, या दृष्टीने आमचा विचार सुरू आहे. पक्ष श्रेष्ठींनी परवानगी दिल्यास मराठी चित्रपट महामंडळाची आगामी निवडणूक लढविण्याची आमची तयारी असल्याचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: