नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे जागतिकस्तरावर दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा

पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे पहिल्यांदाच जागतिक स्तरावर हिंदी आणि इंग्रजी भाषेत दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी निवेदनाद्वारे दिली.

नाट्यसंस्कार कला अकादमी 40 वर्षांहून अधिक काळ बालनाट्य क्षेत्रात कार्यरत आहे. मराठी भाषेत गेल्या 30 वर्षांपासून तर हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून पाच वर्षांपासून दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करीत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर अशा मर्यादित स्वरूपात या स्पर्धा होत असत. पण या वर्षीपासून जागतिक पातळीवर स्पर्धा घेण्याचे संस्थेने नियोजन केले आहे.

या स्पर्धा शिशू गट, पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला अशा सहा गटात होणार आहेत. स्पर्धेला विषयाचे बंधन नसून स्पर्धक कुठल्याही विषयावर नाट्यछटा सादर करू शकतात. विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस दिले जाणार असून प्रत्येकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख दि. 20 जानेवारी 2021 असून दि. 21 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत संस्थेकडे व्हिडीओ पाठवायचे आहेत. स्पर्धेविषयी सविस्तर माहिती 8484930335 या व्हॉटस् अ‍ॅप क्रमांकावर किंवा www.natyasanskar.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: