भारतभूमीची किर्ती जगभर पसरवणारे योद्धा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद – ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी

पुणे : स्वामी विवेकानंदांनी युवकांना जीवनात सुदृढ मन व  व्यायामाचे महत्व पटवून दिले. तसेच ध्यानधारणा आणि योग करण्याविषयी मार्गदर्शन केले. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद हा त्यांचा जीवनप्रवास खूप उर्जात्मक आहे. त्यांच्या मनातील हिंदू धर्माची संकल्पना देखील अनोखी होती. भारतभूमीची कीर्ती जगभर पसरवणारे योद्धा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद होते, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने तसेच पूना नाईट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रात्रशाळेतील विद्यार्थी तसेच युवकांसाठी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला टिळक रस्त्यावरील डॉ. नितू मांडके हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पूना नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अविनाश  ताकवले, शिक्षणतज्ज्ञ डॉ.देवानंद शिंदे, आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या अध्यक्षा अंजली लोणकर, चंदन डाबी, पुरुषोत्तम डांगी, प्रतिक डांगी आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने १०० विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद  चरित्र पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. 

डॉ. देवानंद शिंदे  यांनी  स्वामी विवेकानंदाचे विचार, एकविसाव्या शतकातील शिक्षण पद्धती आणि आजचा विद्यार्थी यावर व्याख्यान दिले. आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात असलेल्या त्रुटी व त्यावर आपण  कशी मात करावी, हे स्वामी विवेकानंदाच्या विचारांच्या आधारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम डांगी व आभारप्रदर्शन प्रतिक डांगी यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: