‘आयुष्य म्हणजे टाईमपास नाही’- डॉ. पी. एन. कदम यांचा तरुणांना सल्ला

पुणे, दि. 14 – आयुष्यात मजा-मस्ती गरजेची आहे. परंतु संपूर्ण आयुष्य म्हणजे केवळ मजा मस्ती आणि टाईमपास नाही. आपले आयुष्य हे केवळ आपल्यासाठी नव्हे तर समाजाला आणि देशाला दिशा देणारे असावे अशा काम तरुणांनी केले पाहिजे असे मत ज्येष्ठ समुपदेशक डॉ. पी. एन. कदम यांनी व्यक्त केले.

संकल्प मानव संसाधन विकास संस्थेतर्फे युवा दिनानिमित्त डॉ. पी. एन. कदम यांच्यासोबत ‘मनावर ताबा, तर जगावर ताबा!’ या विषयावर वेब सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी तरुणांना आयुष्याच्या यशस्वी वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले. आयुर्वेद तज्ञ डॉ. मनीषा भोजकर, शेफ अभिजीत डोंबे यावेळी उपस्थित होते. 

डॉ. पी. एन. कदम म्हणाले, तरुणांच्या मनात काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. त्यांना सकारात्मक दिशेने नेण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. आज अनेक तरुण इतरांना काय वाटेल याचा विचार करून आपले करिअर निवडतात. परंतु त्यातून अनेकदा नैराश्य येते आणि तरुणांच्या मनात आत्महत्येसारखे विचार येतात. अशा प्रकारचे विचार मनात येऊ नये यासाठी आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रांमध्ये काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. अवनी आशिया म्हणजेच अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण यातायात  या क्षेत्रांमध्ये तरुणांना करिअर करण्याच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत. त्यासाठीच या क्षेत्राचा सखोल अभ्यास करून सकारात्मक विचार केला पाहिजे.

यश हे केवळ एका रात्रीत मिळत नाही. आपले ध्येय तरुणांनी निश्चित केले पाहिजे. आपले आयुष्य ही आपली निवड आहे त्यामुळे त्यासाठी कोणते निर्णय घ्यायचे याचा विचारही आपणच केला पाहिजे. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय वाटते याचा विचार जर आपण केला तर आपण अधिक आनंदी जीवन जगू शकतो. यश निश्चित केल्यानंतर त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी असेल तर माणूस नक्कीच यशस्वी होतो असेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.

डॉ. मनीषा भोजकर म्हणाल्या, आपल्या आयुष्यामध्ये दररोज  भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही शिकत असतो. डॉ. पी. एन. कदम हे माझ्या आयुष्यात एक प्रकारे टर्निंग पॉइंट ठरले. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि त्यामुळे मी अधिक सकारात्मक विचार करू शकले. आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्राची जर आपण करिअर म्हणून निवड केली तर आपल्याला अधिक यश आणि आनंद मिळू शकतो. इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. 

अभिषेक डोंबे म्हणाले, जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो तेंव्हा आयुष्यात पुढे काय करायचे याबद्दल काहीही ठोस निर्णय घेतला नव्हता. समोर सर्व अंधकार होता, एक वेळ अशी आली की मी आयुष्याबद्दल अत्यंत नकारात्मक विचार करत होतो, परंतु डॉ. पी. एन. कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर आणि त्यांचे विचार ऐकल्यानंतर माझ्यामध्ये  सकारात्मक बदल झाला. त्यानंतर मी मला आवडणाऱ्या पाककला या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करू लागलो आणि त्यामध्ये मला यशही मिळाले.

Leave a Reply

%d bloggers like this: