युवकांमधील गुणवत्तेला त्या त्या क्षेत्रातील विशेष शिक्षणाची जोड गरजेची-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : भारतातील प्रत्येक युवक-युवतींमध्ये वेगळी गुणवत्ता आहे. आपल्यामध्ये कोणती गुणवत्ता आहे, हे प्रत्येकाला शोधता आले पाहिजे. त्यानुसार आपण त्यामध्ये कशा प्रकारे उच्च शिखरावर जाता येईल हा प्रयत्न करायला हवा. आपल्या गुणवत्तेला त्या त्या क्षेत्रातील विशेष शिक्षणाची जोड देण्याची गरज आहे. तरच युवा वर्ग आणि पर्यायाने देश अधिक सक्षम होईल, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले. 


आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व डॉ.अजय दुधाणे मित्र परिवारतर्फे प्रभात रस्त्यावरील हॉटेल रविराजच्या प्रांगणात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युथ बुथ उपक्रमांतर्गत बिनधास्त बोल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, विवेक राजगुरु, मराठवाडा कॉलेजचे मनीष भोसले, आकाश खाजेकर,व्यंकटेश ढाकणे, मिनाक्षी काळे, संस्कृती कांबळे, अजय मोरे, संदीप चव्हाण, आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचे सहकारी उदय देशमुख व जय जोशी, स्वामीजींच्या वेशभूषेत ऋतीज काळे, अवधूत नवले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 


आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, युवकांनी मोठी स्वप्न बघा, त्याकरीता पैसे लागत नाहीत.स्वप्न बघायला जे आपल्याला प्रेरीत करतात, त्यांच्यासोबत रहा. आयुष्यात आपला प्रवास हा फक्त आपला स्वत:चा असतो, हे लक्षात ठेऊन वाटचाल करा. आपले आयुष्य लोकांप्रमाणे की आपल्याप्रमाणे जगायचे, हे युवा वर्गाने ठरवायला हवे. स्वत:च्या विचारांनी आयुष्य जगायला शिका. दुस-यांच्या विचारांखाली दबून आयुष्य वाया घालवू नये. अडचणीतून वावरताना संघर्ष करायला आपण शिकतो, त्यातूनच आपल्याला संधी मिळते. त्याचा उपयोग तरुणाईने करायला हवा. 
डॉ.अजय दुधाणे म्हणाले, राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांमधून राजकारणात गेलेल्यांशी आजच्या तरुणाईन संवाद साधावा, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याशी युथ बुथ द्वारे बिनधास्त बोल कार्यक्रमात तरुणाईला संवाद साधण्याची संधी मिळत आहे. यामुळे तरुणाईच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. दत्तात्रय सोनार यांनी प्रास्ताविक केले. संजय हिरवे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

%d bloggers like this: