स्वामी विवेकानंद हे सकारात्मक जागतिकीकरणाचे पहिले उद््गाते- प्रा.मिलिंद जोशी

पुणे : आजकाल जागतिकीकरण म्हटले की ग्राहक-विक्रेता, नफा-तोटा, बाजारपेठ असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पूर्वेने पश्चिमेला तत्वज्ञान द्यावे, पश्चिमेने पूर्वेला विज्ञान द्यावे आणि उभयतांनी मिळून विश्वकल्याणाचे पसायदान गावे, असा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला होता. विवेकानंद हे सकारात्मक जागतिकीकरणाचे पहिले उद््गाते होते, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. 


ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेच्या प्रांगणात स्वामीजींना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, अध्यक्ष एस.आर.कुलकर्णी आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. 


प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, विवेकानंदांचे संपूर्ण जीवन हा धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या जयघोषाचा महोत्सव होता. व्यक्तीच्या मोक्षापेक्षाही समाजाचे हित महत्वाचे आहे, असा क्रांतिकारी विचार मांडणा-या विवेकानंदांनी व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचे हित अशी संयुक्त संकल्पना मांडली. पंथाभिमान व स्वमतांधता आणि अनर्थकारी धर्मवेड या गोष्टी मानवी समूहाच्या हिताच्या नाहीत, हे त्यांनी सर्वधर्म संमेलनात केलेल्या भाषणात सांगितले होते.  
ते पुढे म्हणाले, अखिल मानव्याचा विचार त्यांच्या जीवनचरित्रात आणि तत्वज्ञानात भरुन उरला आहे. तो नव्या पिढीने समजून घेतला पाहिजे. विवेकानंद हे सामर्थ्याचे पुरस्कर्ते होते. त्यांनी दुर्बलतेचा धिक्कार केला. स्वत:च्या पायावर उभे करणारे आणि चारित्र्यनिर्मीती करणारे शिक्षण राष्ट्राच्या उभारणीसाठी गरजेचे आहे, असे त्यांनी त्यांच्या शिक्षण विचारातून सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: