जिजाऊंनी स्वराज्यासाठी पणाला लावले मातृत्व – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : स्वराज्यासह छत्रपतींना जन्म देणार्‍या माता जिजाऊ येणार्‍या सर्व पिढ्यांना वंदनीय असून प्रेरक व मार्गदर्शक आहेत. त्यांनी आपले सौभाग्य स्वराज्यासाठी पणाला लावले, मातृत्व हिंदवी स्वराज्याला समर्पित केले. स्वराज्यनिष्ठा जोपासण्यासाठी साक्षात मुलास सदैव मृत्यूच्या दारात उभे करणारे खंबिर व ध्येयवादी मातृत्व जिजाऊंनी सिद्ध केले. माता जिजाऊ शिवाजीराजांसह रयतेच्याही माऊली झाल्या, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. 12 जानेवारी 2021) जिजाऊरत्न पुरस्कारांचे वितरण डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते शिवश्री सचिन आडेकर आणि खेड्यापाड्यात वाचनसंस्कृती रुजविण्याचा ध्यास घेतलेल्या प्रियांका चौधरी यांना जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रमोद आडकर होते. नगरसेवक अविनाश बागवे, लताताई राजगुरू, भंते हर्षवर्धन, राजेंद्र कुंजिर आदी मान्यवर उपस्थित होते. विठ्ठल गायकावाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले, सासर-माहेरच्या संघर्षातूनही जिजाऊंनी मराठी माणसाच्या कल्याणाची वाट शोधली. गाडग्या मडक्यांचा संसार न करता स्वराज्याचा आदर्श कारभार केला. शहाजीराजे, शिवाजीराजे व संभाजीराजे यांच्या भोसलेकुळासह संपूर्ण रयतेला न्याय दिला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सचिन आडेकर आणि प्रियांका चौधरी यांच्या कार्याचा गौरव करून अ‍ॅड. आडकर म्हणाले, वाचनातून आयुष्य घडते हे आडेकर यांच्याकडे पाहून दिसून येते. तर चौधरी यांनी वाचनसंस्कृती रुजविण्याचे मोठे काम हाती घेतले आहे.

सत्काराला उत्तर देताना प्रियांका चौधरी म्हणाल्या, राष्ट्रपुरुषांचा इतिहास पुनर्जिवित करून नव्या पिढीला राष्ट्रपुरुषांच्या विचारांची शिदोरी द्यायची आहे. सचिन आडेकर यांनी सामाजिक-राजकीय वाटचालीतील आपला प्रवास उलगडला. अविनाश बागवे यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.

Leave a Reply

%d bloggers like this: