fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRATOP NEWS

बलात्काराच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा खळबळजनक खुलासा

मुंबई, दि. १२ – सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत सोशल मिडियावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत काही पोस्ट व्हायरल केल्या आहेत. पण या प्रकरणात खुद्द धनंजय मुंडे यांनी खुलासा करत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. केवळ बदनामी आणि ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार असल्याचे मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमुद केले आहे.

रेणू शर्मा या तक्रारदार महिलेचा अर्ज ओशिवरा पोलीस ठाण्याने रात्री उशिरा तक्रार अर्ज स्वीकारला आहे. तक्रारदार मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीची बहिण आहे. आम्ही तक्रार अर्ज स्वीकारला असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, वरिष्टाच्या मार्गदर्शनानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयाराम बांगर यांनी म्हटले आहे.

काय आहे धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट ?

एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांचा पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे मी सर्वोतोपरी त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापन करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.

मात्र २०१९ पासून सदर महिला व तिची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. माझ्या जीवाला गंभीर शारीरिक इजा पोहोचवण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ देखील सहभागी होता. मोबाईलवरून ब्लॅकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे SMSचे पुरावे माझ्याकडे आहेत. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका सोयीने सेटल करण्यासाठी हा दबाव तंत्राचा हा भाग असू शकतो, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमुद केले आहे. रेणू शर्मा यांनी सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये खोट्या, बदनामीकारक, बलात्काराचे आरोप सोशल मिडियावर पोस्ट केल्याविरोधात उच्च न्यायालयात धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा शर्मा यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading