ग्राहक हितासाठी बांधकाम व्यवसायिकांनी स्वत: १% मुद्रांक शुल्क भरावे – क्रेडाई पुणे मेट्रोचे आवाहन

पुणे, दि. १२ – महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर ते डिसेंबर २०२० दरम्यान मुद्रांक शुल्कावर दिलेल्या सवलतीला घर खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कालावधीत मुद्रांक शुल्क हे ५ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आणण्यात आले होते. जानेवारी ते मार्च २०२१ या काळात मुद्रांक शुल्क हे ३% इतके असणार आहे. मात्र ग्राहक हिताचा विचार करता स्वत: बांधकाम व्यसायिकांनी यापैकी १% टक्के शुल्क भरावे, जेणेकरून मार्च अखेर पर्यंत ग्राहकांसाठी मुद्रांक शुल्क हे २% इतकेच राहील, असे आवाहन क्रेडाई पुणे मेट्रो या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेने केले आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष मर्चंट म्हणाले की, १ सप्टेंबर पासून मुद्रांक शुल्कात मिळालेल्या सवलती नंतर घर खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह वाढला असून मुद्रांक शुल्क विभागात दस्त नोंदणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामध्ये सप्टेंबर महिन्यात २.४८ लाख, ऑक्टोबर महिन्यात २.७४ लाख, नोव्हेंबर महिन्यात २.७५ लाख तर डिसेंबर महिन्यात विक्रमी ४.५९ लाख नोंदी झालेल्या पहायला मिळाल्या.

ही परिस्थिती कायम राहावी, या दृष्टीने क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने ही सवलत जून २०२१ पर्यंत कायम करावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली होती. बांधकाम क्षेत्राशी इतर किमान ३०० व्यवसाय जोडलेले असून या निर्णयाचा फायदा ग्राहकां सोबतच या सर्वांना देखील होईल, असा आमचा यामागील विचार होता. मात्र सरकारने अद्याप ही विनंती मान्य केलेली नाही. त्यामुळे केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार करीत पुढील काही दिवस बांधकाम विकसकांनी हे १ टक्के मुद्रांक शुल्क स्वत: भरावे व ग्राहकांना मागील प्रमाणे २% इतकेच मुद्रांक शुल्क कायम ठेवण्यात मदत करावी, असे आवाहन आम्ही करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.    

Leave a Reply

%d bloggers like this: