fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNE

राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात फक्त २ टक्के महिला – पंकजा मुंडे

पुणे, दि. १३ – राष्ट्रीय स्तरावर फक्त २ टक्के महिला राजकारणात आहेत. एकीकडे जागतिक पातळीवरील राजकारणात कित्येक देशात महिलांना ५२ टक्के आरक्षण दिले गेले आहे. परंतू आपल्याकडे अजून या गोष्टीवर संपूर्णपणे विचार झालेला नाही, असे मत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे-पालवे यांनी व्यक्त केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे चार दिवसीय ऑनलाईन दुसर्‍या राष्ट्रीय महिला संसदेच्या दुसर्‍या दिवसाच्या सत्रात प्रमुख पाहुण्या म्हणून ‘राजकीय नेतृत्व-(महिला २.०, शक्ती, आवड आणि राजकारण)’ या विषयावर त्या बोलत होत्या. ही संसद १४ जानेवारी पर्यंत चालणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, माजी खासदार मिनाक्षी नटराजन, डॉ. हर्षिता पांडे, डॉ. राणी बंग, डॉ. गिरीष कुलकर्णी, आमदार प्रणेती शिंदे, डॉ. संगीता रेड्डी, पद्मश्री अरूणाचलम मृगंथम, प्रा. राजेंद्र कचरू, लिलाबेन अंकोलिया, वनाथी श्रीनिवासन, प्रमिला नायडू या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ कराड हे होते. या वेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील आणि सहयोगी संचालिका प्रा.डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा सांभाळल्यानंतर देशातील आर्थिक व संरक्षण विभागाच्या महत्वपूर्ण मंत्रीपदाचे सूत्र महिलांच्या हातात दिले आहे. तसेच, ६ महिलांच्या खांद्यावर केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. आणि त्या यशस्वीपणं सांभाळत आहेत. देशाचे लोकसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री, मंत्री अशा विविध पदांवरांची जबाबदारी महिलांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी सतत म्हणायचे, की महिला कोणत्याही क्षेत्रात पुरूषांपेक्षा कमी नाहीत. जन्मापासून प्रत्येक गोष्टीसाठी लढणार्‍या महिलांनी कधीही कमजोर समजू नये. कारण त्यांना जन्मानंतर पोषण, शिक्षण आणि त्यानंतर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. भविष्यात अनेक गोष्टींसाठी महिलांना सामना करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात यावे.

अ‍ॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, सतत संघर्ष करणार्‍या महिलांना आर्थिक साक्षरता करणे गरजेचे आहे. बर्‍याच पदांवर पुरूषी वर्चस्व दिसते त्याला तडा देत महिलांना समोर आणने आता आवश्यक आहे. महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणार्‍या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतो परंतू आजही आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांचा शोध घ्यावा लागत आहे.

डॉ. राणी बंग म्हणाल्या, वर्तमान काळात महिलांच्या शारीरिक समस्यांकडे विशेष लक्ष द्यावे. महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे मुळ दारू असल्याने त्याच्या विरोधात आवाज उठवावा. मुलींचा आदर सन्मान करण्याची सुरूवात प्रत्येक घरातून केली गेली पाहिजे. सध्या दारू व तंबाकूच्या आहारी गेलेल्या युवावर्गांला व्यसनमुक्त केल्याने बर्‍याच समस्या या मुळापासून संपतील.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, महिलांमध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी हा मंच उत्तम आहे. आधुनिक काळात महिलांनी स्वताचे मानसिक आरोग्य चांगले ठेवावे त्यासाठी कार्य करावे. आज मोठ्या प्रमाणात सोई सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत परंतू त्याचा फायदा किती महिला घेतात हे पाहणे गरजेचे आहे. तसेच महिलांना खर्‍या अर्थाने सबलीकरण करावयाचे असेल तर तळागाळापर्यंत  आम्हाला पोहचावे लागेल.

लिलाबेन अंकोलिया म्हणाल्या, देशातील महिलांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर मोठ्या प्रमाणात कार्य होणे गरजेचे आहे. महिलांना एकत्रित करून त्यांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सबलीकरण करणे गरजेचे आहे.


हर्षिता पांडे म्हणाल्या, राजकारणाशिवाय विकासाची गोष्ट करणे असंभव आहे. सत्ताधाऱ्यांशिवाय  देशातील नियोजनच तयार होत नाही. महिला सबलीकरण व विकासाच्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा राजकारणाचा पैलू सोडता येणार नाही. त्यामुळे महिलांनी राजकारणात प्रवेश करावा.”मिनाक्षी नाटराजन म्हणाल्या,“या देशात पितृसत्ताक प्रभाव असल्यामुळे महिलांचे सबलीकरण सारख्या विषयांवर विचार करण्याची वेळ आली आहे. दोन विचारधारा असलेल्या समाजात पुरूष श्रेष्ठ आहे, ही संकल्पना बदलण्यासाठी महिलांना त्यांच्या विरोधात आवाज उठवावा लागेल.

त्या नंतर अरूणाचलम मृगंथम, डॉ. संगीता रेड्डी, प्रा. राज कचरू, डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी महिलांना शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर कशा पद्धतीने सक्षम करता येईल या विषयावर विचार मांडले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading