Saturday, May 30, 2026
PUNE

पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार योजना जाहीर

पुणे , दि. १ – मराठी अस्मितेचे एक सांस्कृतिक केंद्र अशी मराठी दिवाळी अंकांच्या शंभराहून अधिक वर्षाच्या परंपरेची ओळख सांगता येईल. अशा या वैभवशाली परंपरेला पुन्हा एकदा देदीप्यमान स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून उत्तमोत्तम दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून पुण्यभूषण फाऊंडेशन तर्फे दर वर्षी सर्वोत्तम दिवाळी अंकास एक लाख रुपये आणि सुवर्णमुद्रांकित प्रशस्तीपत्र असा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. पुढील किमान १० वर्षे हा पुरस्कार सातत्याने देण्यात येईल.

पुण्यभूषण फाउंडेशन चे संस्थापक डॉ सतीश देसाई,तसेच संजय भास्कर जोशी यांनी नव वर्षाच्या पहिल्या दिवशी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉ सतीश देसाई म्हणाले,’अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, गेली ३२ वर्ष पुण्यभूषण पुरस्कार, २० वर्ष दिवाळी पहाट, १० वर्ष पुण्यभूषण दिवाळी अंक निर्मिती अशा दिमाखदार सांस्कृतिक परंपरा पुण्यभूषण फाऊंडेशन चालवत आहे. या वैभवशाली मराठी सांस्कृतिक परंपरेला पुढील अध्याय जोडण्यासाठी, मराठी वाचन -लेखन संस्कृती पुढे नेण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरु केली जात आहे.

पुण्यातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्वास दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्याप्रमाणे एक मानदंड झाला आहे तसाच हा ‘पुण्यभूषण दिवाळी अंक पुरस्कार’ एक मानदंड ठरेल . त्याच बरोबर दर वर्षी दिवाळी अंकातील उत्तम साहित्यास कथात्म गद्य , ललित / वैचारिक गद्य आणि काव्य असे 3 पुरस्कार (प्रत्येकी रु. ११,००० आणि मानपत्र) देण्यात येतील. ११ हजाराचे पुरस्कार पु ना गाडगीळ (नळ स्टॉप ) यांच्या वतीने देण्यात येणार आहेत . या पुरस्कार योजनेला नरेंद्र चपळगावकर, रामदास भटकळ, दिलीप माजगावकर,सदानंद मोरे आणि डॉ अरुणा ढेरे हे ज्येष्ठ मार्गदर्शन करतील. संजय भास्कर जोशी म्हणाले ,’विजेत्या दिवाळी अंकाचे प्रकाशक आणि संपादक भिन्न असतील तर सन्मानपत्र प्रकाशकास दिले जाईल तर एक लाख रुपयांची रक्कम दोघात विभागून दिली जाईल. प्रकाशक आणि संपादक एकच असतील तर अर्थातच सन्मानपत्र आणि रक्कम प्रकाशक-संपादकास देण्यात येईल. कोणत्याही अंकास किंवा लेखकास हा पुरस्कार एकदाच दिला जाईल. पुढील वर्षात माजी विजेत्यांचा सत्कार केला जाईल. सर्वोत्तम अंक निवडण्याचे निकष जात, धर्म, प्रदेश, राजकीय विचारधारा या कोणत्याही बाबीचा विचार करणारे नसून केवळ साहित्य आणि कलामूल्ये यांचाच विचार केला जाईल. या वर्षीच्या पुरस्कारासाठी आपले दिवाळी अंक दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत पुस्तक पेठ

लक्ष्मीछाया, आयडियल कॉलनी, आयडियल ग्राउंड जवळ, पौड रोड, पुणे ४११०३८ या पत्त्यावर पाठवावेत ,असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
याबाबत अधिक माहितीसाठी
संजय भास्कर जोशी (९८२२००३४११) / महेंद्र मुंजाळ ( ७७४४८२४६८५) यांच्याशी संपर्क साधता येईल .
जे अंक पुरस्कारासाठी पाठवले जातील त्यांचा विचार प्राधान्याने केला जाईल, पण पुरस्कारासाठी न पाठवलेल्या अंकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य निवड समितीला असेल.

हा पुरस्कार समारंभ मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ फेब्रुवारी २०२१ ला आयोजित करण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading