Sunday, May 31, 2026
PUNE

प्रतिकुलतेवर मात करीत आनंदाने जगणे ही साधनाच – प्रा. मिलिंद जोशी

पुणे – आपण आपले दुःख खूप सजवतो त्यामुळे निराश होतो. आपल्यापेक्षा अधिक दुःख, वेदना आणि संकटे पेलणाऱ्या माणसांकडे आपण पाहिले तर आपले दुःख किती क्षुल्लक आहे, याची जाणीव होते.  प्रतिकुलतेवर मात करीत आनंदाने जगण्यासाठी साधनाच लागते, असे मत प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. 


डाॅ.मुकुंद कोठावदे लिखीत आणि एकदंत प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित “एकदंत- व्यथा नव्हे कथा” या पुस्तकाचे प्रा.मिलिंद जोशी आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्यावेळी जोशी बोलत होते. डाॅ.मुकुंद कोठावदे यांच्या पत्नी माधुरी कोठावदे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माधुरी कोठावदे यांनी ज्या लढाऊ वृत्तीने कृकरोगासारख्या आजाराचा धीरोदात्तपणे सामना केला त्या प्रवासावर आधारीत हे पुस्तक आहे. यावेळी डाॅ. मुकुंद कोठावदे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, जन्म आणि मृत्यू या गोष्टी सृष्टीतल्या सर्वांच्याच वाट्याला येणार आहेत. या दोन्हीच्या मधले जगणे माणूस कसे सुंदर करतो यावर त्या जगण्याची गुणवत्ता ठरते. शब्दांनी देखील निःशब्द व्हावे असे जीवन माधुरीताई जगल्या.  कर्करोगासारख्या आजाराशी सुमारे साडे अकरा वर्षांहून अधिक काळ झुंज देत त्यांनी त्यांच्यातील योद्ध्याचीच प्रचिती दिली. माधुरीताईंनी त्यांच्या आजारपणाचे कोणतेही भांडवल न करता मुलीचे लग्न असो किंवा परदेशवारी असो त्या भरभरून आणि रसरसुन आयुष्य जगल्या. कर्करोगाच्या उपचारांच्या वेदनांचा लवलेशही त्यांच्या चेह-यावर कधी जाणवला नाही. महिला मंडळातील कामांपासून रोटरीच्या निधीसाठी जाहीराती गोळा करणे असो  ही सगळी कामे त्यांनी झोकून देऊन केली. आपले दुःख बाजूला सारून दुस-याच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती काैतुकास्पद होती. त्यांचे हे आदर्शवत जीवन अनुकरणीय आहे. कुटुंबाने देखील माधुरीताईंचे आजारवण स्विकारुन त्यांच्या लढाईत बरोबरीने साथ दिली, हेदेखील कौतुकास्पद म्हणावे लागेल. आयुष्यात बरे वाईट अनुभव येऊनही जीवना विषयी कसलीही तक्रार नसणा-या आणि वेदनेला सर्जनाचे परिामाण देणा-या या अनोख्या दंतवैद्याची ही कहाणी वाचकानांही भावेल अशी आशा आहे.


यावेळी बोलताना डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या की,  अवघड प्रसंग आला की तुमच्यातील गुणांची कसोटी लागते. परिस्थिती फासे टाकत असते आणि आपल्यासमोर आव्हाने उभी करीत असते. ते फास सोडवत हसत खेळत आयुष्य जगता आले पाहिजे.  लेखक डाॅ.मुकुंद कोठावदे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading