fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

भाई वैद्य यांचे जीवन म्हणजे आदर्श सत्याग्रही जीवन – डॉ.बाबा आढाव

‘भाई वैद्य एक सामाजिक पर्व’ लघुपटाचे लोकार्पण

पुणेः- समाजवादी लोकशाहीचा ध्यास घेतलेल्याला भाई वैद्य यांनी मूल्याधिष्ठीत जीवनाला कायमच प्राधान्य दिले. भाई वैद्य यांचे जीवन म्हणजे आदर्श सत्याग्रही जीवन होते, असे मत हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

आरोग्य सेनेतर्फे दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘भाई वैद्य एक सामाजिक पर्व’ या लघुपटाचे लोकार्पण आज डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. हमाल भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख डॉ.अभिजीत वैद्य, चित्रपट दिग्दर्शक धनंजय भावलेकर आणि चित्रपट लेखक डॉ.अनिल सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.बाब आढाव म्हणाले की, समाजातील शोषित आणि वंचित घटकांबद्दल भाई वैद्य यांना कायमच अस्वस्थता वाटायची. समाजाच्या तळागाळातील प्रत्येक घटक बद्दल त्यांना वाटत असलेली तळमळ ही केवळ भावनेपुरती मर्यादित नव्हती, तर या घटकांसाठी भाई वैद्य यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. हे करीत असताना त्यांनी कधीच आपल्या समाजवादी मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यांनी आपल्या जीवनकार्यातून आदर्श जीवनाचा परिपाठ घालून दिला.

यावेळी बोलताना चित्रपटाचे लेखक डॉ. अनिल सपकाळ यांनी या लघुपट निर्मिती मागील प्रवास उलगडला.ते म्हणाले की, भाईंचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते. त्यांनी केलेली आंदोलने, महाराष्ट्रतील सांस्कृतिक वेगवेगळ्या घडामोडी यांचा अनुबंध मांडला आहे. कथा स्वरुपात भाईंचे कार्य अजून व्यापक पद्धतीने तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याच प्रयत्न केला आहे.

चित्रपट दिग्दर्शक धनंजय भावलेकर म्हणाले की, समाजकारण आणि राजकारणात भाई वैद्य यांचे कार्य खूप मोलाचे आहे. भाईंच्या विचारांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. त्यांच्या सभा, आंदोलने हे अभ्यसकांना मार्गदर्शक ठरणारी आहेत. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांच्या कार्याचे दस्तऐवजीकरण करणारे लोक होते. बरेचदा असे दस्तऐवजीकरण होत नाही आणि त्यामुळे पुढील पिढ्यांना चांगल्या कामाचे संदर्भ उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे विविध क्षेत्रातील बहुमोल व्यक्तिमत्वांचे दस्तऐवजीकरण होणे आवश्यक आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजीत वैद्य यांनी भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीचे सदस्य प्रमोद दळवी यांनी केले. कमलेश हजारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading