कोरोना – राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर! आज ७,४८६ रुग्ण झाले बरे!
मुंबई, दि. ६ – राज्यात एकीकडे लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनचे काही नियम पुन्हा लागू करण्याची चर्चा सुरू झालेली असताना दुसरीकडे कोरोनाचा रिकव्हरी रेट राज्यातल्या जनतेसाठी दिलासादायक ठरू लागला आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ७ हजार ४८६ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९३.०४ टक्के इतका झाला आहे. त्यासोबतच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांवरून काढला जाणारा मृत्यूदर २.५८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. राज्यात आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता १८ लाख ५२ हजार २६६ इतकी झाली आहे. त्यापैकी आता ८० हजार ०७९ रुग्णांवर उपचार सुरु असून इतर बाधितांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
