विधानपरिषदेत प्रस्थापित घराणेशाहीच्या ‘धनशक्ती’ चा विजय – संतोष शिंदे
पुणे, दि. 4 – जनतेला सध्या या प्रस्थापित पक्षांशिवाय तिसरा पर्याय नाही. कारण जोपर्यंत सक्षम पर्यायावर लोकांचा विश्वास बसत नाही तोपर्यंत या घराणेशाहीला खतपाणी घालत बसावं लागतं असाच नागरिकांचा गोड गैरसमज झालेला आहे. जोपर्यंत पैसेवाली गिधाडं… निवडणुका जिंकण्यासाठी मतदान विकत (पळवून) घेतील, तो पर्यंत लोकशाहीचा निश्चित असा विजय होणार नाही…! असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, यांनी व्यक्त केले आहे.
आम्ही प्रस्थापित घराणेशाहीच्या पक्षांना नेहमी हरवण्यात कमी पडत आहोत. आम्हाला प्रशिक्षित कार्यकर्त्यांची संख्या वाढवली पाहिजे. कारण आमची शक्ती वेगवेगळ्या पक्षात विनाकारण खर्ची होत आहे. आमचेच काही लोक क्षणिक स्वार्थासाठी ज्यावेळी आमच्या विरोधात उभे राहतात त्यावेळी आमचा मतदार विभागला जातो. आपले कोण आणि परके कोण…? हे वेळीच ओळखून घेऊ व आपल्या नेत्याचे हात आपण बळकट करू…!!
यापुढे मतपत्रिकेवर’च निवडणुका व्हायलाच पाहिजेत… थोडा वेळ जातो, पण घोटाळे करणाऱ्यांचा ‘माज’ जिरतो…! हे या निवडणूकीत सिध्द झाले आहे. कोणत्याही निवडणुकीत प्रामाणिक कार्यकर्त्याच्या कष्टाचा आणि उमेदवाराच्या संघर्षाचा विजय झाला पाहिजे. तरच लोकशाही जिंदाबाद असेल…
प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीचा अभ्यास केला पाहिजे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची ‘आत्मचिंतन’ व ‘अभ्यास’ करण्याची हीच खरी योग्य वेळ आहे. ‘संघर्ष हमारा है…’ त्यामुळे आपण लढतच राहु… असेही शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.
–
