आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर स्पर्धेत पुण्यातील संघाने पटकाविला प्रथम क्रमांक

पुरुषोत्तम देठ, निखिल पटने आणि सोमेश काचावार  यांच्या संघाला ‘द ड्रॉईंग बोर्ड’ या आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर स्पर्धेत प्रथम क्रमांक

पुणे, दि. 2 – पुण्यातील पुरुषोत्तम देठ, निखिल पटने आणि सोमेश काचावार या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ‘द ड्रॉईंग बोर्ड’या आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. बंगळुरूमधील माईंडस्पेस आर्किटेक्ट्स आणि पुण्यातील रोहन बिल्डर्स यांच्यातर्फे सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘द ड्रॉईंग बोर्ड’ ही आर्किटेक्चर क्षेत्रातील नैऋत्य आशियातील महत्त्वाची स्पर्धा समजली जाते, स्पर्धेचे हे सलग पाचवे वर्षे होते. रोहन बिल्डर्सचे अध्यक्ष सुहास लुंकड आणि माईंडस्पेस यांनी या स्पर्धाच्या नियोजनासाठी विशेष प्रयत्न केले.

स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे जपान येथील टेझुका आर्किटेक्ट्स या आर्किटेक्चर संस्थेचे संस्थापक आर्किटेक्ट टकाहारु टेझुका, मुंबईमधील ओपोलिस या आर्किटेक्चर संस्थेचे संस्थापक आर्किटेक्ट राहुल गोरे आणि स्टुडिओ मुंबई या आर्किटेक्चर संस्थेचे संस्थापक आर्किटेक्ट बिजॉय जैन अशा दिग्गजांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

चौदा देशांमधील १३०० हुन अधिक आर्किटेक्चर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला तर यामधून सवोत्कृष्ट तीन संघ विजयी झाले.  पुरुषोत्तम, निखिल आणि सोमेश हे ‘व्हीआयटी’ संस्थेच्या ‘पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’चे विद्यार्थी आहेत. त्यांना प्रथम क्रमांक पटकावित रु. ५० हजार चे पारितोषिक मिळविले. चित्तगॉन्ग, बांग्लादेश येथील चित्तगॉन्ग युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी फैसल हुसेन, सुमैय्या सुलताना व सदमान अली यांना ‘फर्स्ट रनर अप’चे रु. ३५,००० चे पारितोषिक, तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या कलकत्त्याच्या ऐमीटी युनिव्हर्सिटीच्या अनुषा मुखर्जी व नमन श्रौफ यांना रु. २५,००० चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. सर्व विजेत्या संघांना रोहन बिल्डर्स येथे पेड इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात आली आहे.

आपली घरे बांधणारे कामगार, हे बांधकामाच्या साईट जवळच लेबर कॅम्प मध्ये तात्पुरत्या घरांमध्ये राहतात. त्यांची तात्पुरती घरे राहण्यायोग्य असावीत, तेथील वातावरण आपुलकी वाढविणारे असावे आणि सर्व कामगार व त्यांच्या परिवारांना पूरक असावे, अशा रचनेचे डिझाईन करणे हे यावर्षीचे स्पर्धकांसाठीचे आव्हान होते. या वर्षीच्या स्पर्धेला ६४० पेक्षा अधिक प्रेक्षक लाभले. या यशाचे एक कारण ऑनलाईन आयोजन समजण्यात येत आहे. दर वर्षीप्रमाणे ऑफलाईन आयोजन न करता, आयोजकांनी या वर्षी ऑनलाईन स्पर्धा घेतली आणि याच निर्णयाचा योग्य लाभ सर्व स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षकांना उचलता आला.

महेश बांगड यांनी संपूर्ण स्पर्धेचे उत्तम सूत्रसंचालन केले तसेच ऋचा लुंकड यांनी रोहन बिल्डर्स तर्फे सर्व स्पर्धक, परीक्षक, आयोजक टीम, सहकारी यांचे मनःपूर्वक आभार प्रदर्शन केले. मधुश्री कोल्हटकर यांनी स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांची घोषणा केली.

मॅटर स्टुडिओ, लीवार्डिस्ट्स,  आर्किटेक्चर लाईव्ह,  बिल्डकॉन मॅगझीन, अमेझिंग आर्किटेक्चर, SPACI UX, व इंडिया डिजाईन वर्ल्ड यांचे सहकार्य या स्पर्धेस लाभले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: