तिसऱ्या वनडेत भारताने मारली बाजी, ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली मालिका

कॅनबेरा- ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात विराटसेनेने बाजी मारली आणि 13 धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने क्लीन स्वीप टाळला तर ऑस्ट्रेलियाने 2-1 ने तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकली.

भारताने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 303 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 10 विकेट गमावून 289 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 59 धावा, कर्णधार आरोन फिंचने 75, अ‍ॅलेक्स कॅरीने 38 धावा केल्या. पहिल्या दोन्ही सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखला. आजच्या सामन्यात भारताकडून शार्दूल ठाकूरने 3, टी नटराजन आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी 2 तर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. यंदा सलामीला आलेला मार्नस लाबूशेन स्वस्तात माघारी परतला. भारताविरुद्ध सलग दोन शतक करणारा स्टिव्ह स्मिथ यंदा 7 धावाच करू शकला. मोईसेस हेनरिक्सने कर्णधार फिंचने डाव सांभाळला. दोंघांमध्ये 61 धावांची भागीदारी झाली, पण शार्दूल ठाकूरने त्याला 22 धावांवर पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला. यादरम्यान फिंचने मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक ठोकले. जाडेजाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फिंच 75 धावांवर शिखर धवनकडे सीमारेषेवर झेलबाद झाला. पदार्पण करणारा कॅमेरून ग्रीनने 21 धावा केल्या. त्यानंतर कॅरी आणि मॅक्सवेलने फटकेबाजी करता ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम ठेवले. मात्र, जाडेजाच्या गोलंदाजीवर चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात कॅरी धावबाद झाला. मॅक्सवेल 59 धावांवर खेळत असताना बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला आणि संघाचा विजय निश्चित केला.

यापूर्वी, भारताकडून कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केली. आघाडीच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीचे सत्र इथेही सुरूच राहिले, पण अखेरच्या षटकांमध्ये कांगारुंची धुलाई करत पांड्या-जाडेजा जोडीने भारताला दमदार पुनरागमन करुन दिलं. पांड्याने नाबाद 92 तर जाडेजाने नाबाद 66 धावा केल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: