Friday, September 4, 2026
PUNE

मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा अधिक वेगाने झाली’- देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 25 – मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली असं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं,” असंही ते म्हणाले आहेत. “आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“निष्क्रिय सरकारविरूद्ध मोठा रोष जनतेत आहे. शेतकर्‍यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळे मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल. आमच्या एकाही आंदोलनाची दखल घेतली नाही, एकाही पत्राला उत्तर नाही, कधी कोणती बैठक घेत नाही. या सरकारला प्रश्न सोडवायचे नाही. अशावेळी जनतेचे दु:ख मांडले गेले पाहिजेत आणि तेच आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून मांडतो आहोत,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

“आम्हाला आनंद आहे की किमान पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरती तरी त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आहे,” असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. “मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे केवळ मराठाच नाही, तर सार्‍याच समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिले नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

‘आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही. पण, हेही तितकेच खरे आहे की, अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत. ज्यादिवशी पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ,” असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading