Tuesday, June 16, 2026
PUNE

आपण मानवता धर्माचे वारकरी – डॉ. अभिजीत वैद्य

ज्ञान फौंडेशन आणि दादा कोंडके मेमोरिअल फाऊंडेशनतर्फे कुष्ठरोगी भगिनींना भाऊबीज

पुणेः- कोणत्याही कारणाने समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या वंचितांचा विचार करून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हीच खरी दिवाळी असते. कारण आपण मानवता धर्माचे वारकरी आहोत, असे मत आरोग्य सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजीत वैद्य यांनी व्यक्त केले.

ज्ञान फौंडेशन, पुणे आणि दादा कोंडके मेमोरिअल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा येथील डॉ. बंदोरवाला कुष्ठरोग केंद्रातील कुष्ठरोगी भगिनींची भाऊबीज साजरी करण्यात आली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजीत वैद्य बोलत होते. यावेळी भाऊबीज निमित्त 65 कुष्ठरोगी भगिनींना माहेरची साडी आणि 200 कुष्ठरोगी बंधू-भगिनींना च्यवनप्राश दिवाळी भेट देण्यात आली. तसेच यावेळी वडगाव धायरी येथील नवरत्न वृ्द्धाश्रमातील वृद्धांना वामनराव जगताप आणि विश्वनाथ हलगणे यांच्या हस्ते साड्या आणि चवनप्राश वाटप करण्यात आले. अॅड. संतोष म्हस्के आणि सुरेश नावडकर आणि फौंडेशनच्या पुढाकारातून हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच डोणजे येथील आपले घर चे संचालक विजय फळणीकर यांच्या उपस्थितीत 35 मुलांना चवनप्राशचे वाटप करण्यात आले.

यावेळी दादा कोंडके मेमोरिअल फाऊंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम, कर सल्लागार चंद्रकांत आंबिलवादे, महावितरणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता भागवत थेटे, अमरसिंह राजपूत, गणेश जाधव, वर्षा गुप्ते, शैलेंद्र भालेराव, अनिता कामथे, फिलीप्स थॉमस पॉल, डॉ. बंदोरवाला कुष्ठरोग केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले की, मनातील सकारात्मकतेचे दीप तेवत ठेवून इतरांचे आयुष्य उजळवणे हेच खरे समाजकार्य असते. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि अशा प्रकारच्या सामाजिक जाणीवेतून समाजात समानता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. समातधिष्ठीत समाजाची निर्मिती हेच आपले ध्येय असून त्यासाठी सगळ्या प्रकारचे भेद बाजूला सारून माणुसकी या एकाच धाग्याने सगळ्यांनी जोडले जाणे आवश्यक आहे.

यावेळी मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट, नवी दिल्लीतर्फे पुणे जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अमरसिंह राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादा कोंडके मेमोरिअल फाऊंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते यांनी केले. महावितरणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता भागवत थेटे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading