मराठवाड्यात भाजपला धक्का; माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा राजीनामा

औरंगाबाद, दि. 17 – विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीवरुन भाजपमध्येही नाराजीनाट्य रंगले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा पाठवून त्यांनी भाजप पक्षाचा त्याग केला. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले होते. त्यानंतर मराठवाड्यातील या मोठ्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीचे गणित बदलू शकते.

जयसिंगराव गायकवाड यांनी आज सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून भाजपच्या प्रदेश कार्य समिती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित न झाल्यामुळे ते पक्षावर नाराज होते. भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. “मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा मुळचा भाजपचा आहे. इथे नवीन प्रयोग थांबवून हा मतदारसंघ खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्या”, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली होती. त्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांनी स्वतंत्रपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता ते आपला अर्ज मागे घेणार असल्याचे समजते.

राजीनामा दिल्यानंतर जयसिंगराव म्हणाले की, “मी अनेकवर्षांपासून पक्षाकडे नवीन जबाबदारी मागत होतो. अनेकवेळेला संबंधित नेत्यांना फोनही केले. मात्र माझा फोन घेतला जात नाही. मी पाठविलेल्या ईमेलला रिप्लाय देखील दिला नाही. मग पक्षात राहून मी काय करु? मराठवाड्यात मुंडे आणि महाजन यांच्यानंतर पक्षवाढीसाठी मी प्रयत्न केले. मात्र आता मला सन्मानाची वागणूक दिली जात नाही, त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.”

जयसिंगराव गायकवाड यांनी बीड लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांनी शिक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. दोन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यामाध्यमातून राज्य सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. भाजप पक्षातही त्यांनी अनेकदा विविध पदांवर काम केलेले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: