लाभाची अपेक्षा न करता केलेले काम निरपेक्ष-राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

पुणे : गाय वासराला जशी सांभाळते तसे संत आम्हाला सांभाळतात. परतफेडीची कोणतीही अपेक्षा यामध्ये नसते. आपण सेवा करायला तत्पर असणे, हेच आपले कर्तव्य आहे. आपण कोणावरही उपकार केले, ही भावना चुकीची आहे. त्यामुळे लाभाची अपेक्षा न करता केलेला काम निरपेक्ष समजले जाते. सेवेचा हाच धर्म पुण्यातील गणेशोत्सव मंडळे व संस्था पाळत असून संतांनी सांगितलेली सेवा करीत आहेत, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. 


निमित्त होते, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्थांतर्फे दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, याकरीता श्रीवत्स संस्थेच्या आवारात आपुलकीची दिवाळी या कार्यक्रमाचे. यावेळी रा.स्व.संघ पुणे महानगरचे संस्था सहयोगी मिलन संयोजक शशिकांत पडळकर, सोफोशचे अध्यक्ष शाम मेहेंदळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, विजय चव्हाण, मेहुणपुरा मंडळाचे पराग ठाकूर, आधारवड संस्थेच्या वासंती भालेराव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यंदा २४ वे वर्ष आहे. श्रीवत्स संस्था आणि आधारवड, भोर या संस्थांना यांना आवश्यक असणारी ४ लाख रुपयांची आर्थिक व वस्तुरुपी दिवाळी भेट देण्यात आली. 

शशी पडळकर म्हणाले, सज्जनशक्ती आणि सक्रियशक्ती एकत्र आली की समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोकविणे सहज शक्य आहे. अनेक वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरु असून इतरांसाठी प्रेरणादायी आहे. वंचित, अनाथ आणि विशेष मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल, तर त्यांना भरघोस प्रेम द्यायला हवे.


पराग ठाकूर म्हणाले, तब्बल २४ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा उपक्रम ५०० रुपये मदतीपासून सुरु झाला होता. आजमितीस या उपक्रमाला समाजातील विविध गणेशोत्सव मंडळे आणि दानशूरांकडून मोठया प्रमाणात सहाय्य मिळत आहे. समाजातील वंचित घटकांना गरजेच्या वस्तू देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होत आहे, असेही त्यांनी सांगितले.  एल.आय.सी.पुणे शहर, इमरसन कंपनीचे सेवक, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, कडबेआळी मित्र मंडळ, कुंभोजकर मित्र परिवार, अभेद्य वाद्य पथक, नवा विष्णू चौक नवरात्र उत्सव मंडळ, आफळे अ‍ॅकॅडमी, तुळशीबाग गणपती मंडळ आदी संस्थांनी उपक्रमात सहभाग घेतला होता. आर्या ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: