परिवर्तनाच्या चळवळीला बळ देणाऱ्या प्रत्येक विचारास प्राधान्य – डाॅ. अभिजीत वैद्य

पुणेः- आरोग्य सेना एका दिशेने, एक दिलाने आणि एक विचार घेऊन परिवर्तनाच्या दिशेने निघालेली चळवळ आहे. हे परिवर्तन कोणकोणत्या क्षेत्रात आणि कसे घडवून आणायचे याबाबत एक वैचारिक बैठक असून दिवसेंदिवस ही चळवळ वाढत आहे. या परिवर्तनाच्या चळवळीस जो जो विचार पूरक ठरेल, पाठबळ देईल, सशक्त करेल त्या प्रत्येक विचारास आम्ही प्राधान्य देऊ आणि त्या विचारास उचलून धरण्याचे काम पुरोगामी दिवाळी अंकाद्वारे केले जाईल, असा विश्वास आरोग्य सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. अभिजीत वैद्य यांनी व्यक्त केला.

आरोग्य सेनेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पुरोगामी जनगर्जना’ या दिवाळी अंकाचे डाॅ.अभिजीत वैद्य यांच्या ह्स्ते प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे राष्ट्रीय संघटक शरद जावडेकर, आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, वर्षा गुप्ते, सम्राट शिरवळकर, रमाकांत सोनवणी, प्रा.प्रमोद दळवी, कमलेश हजारे, प्रा डॉ.गीतांजली वैद्य, दि वायरचे नितीन ब्रम्हे, राजश्री दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डाॅ. अभिजीत वैद्य म्हणाले की, दिवाळी अंकांना सर्व साधारणपणे दिवाळीच्या काळातील मनोरंजनात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाते. पंरतू, काही दिवाळी अंकांना संदर्भमूल्य म्हणून म्हत्त्व प्राप्त होते. अशा काही मोजक्या दिवाळी अंकांमध्ये ‘पुरोगामी जनगर्जना’ या दिवाळी अंकाचा आवर्जून समावेश होतो, याचा मला अभिमान आहे. स्मिता पाटील चित्रपट महोत्सव, दिवाळी अंक, आरोग्य सेनेचे कार्य या सगळ्यामध्ये सातत्य आहे. सातत्याबरबरोच दिवसेंदिवस या कार्याचा वैचारिक परिघ वाढत आहे. ही वाटचाल सुरु असतांना नवनव्या आव्हानांना आरोग्य सैनिक मोठ्या धैर्याने सामोरे गेले. या कार्यात सातत्य राखत प्रखरताही वाढत गेली आहे, हे देखील अधोरेखित करण्यासारखेच आहे.

यावेळी बोलतांना डाॅ. अभिजीत वैद्य म्हणाले की,पत्रकार हा समाज आणि राजकारणाचा आरसा असतो. दिसणाऱ्या सत्य रूपाचे निःपक्षपाती विश्लेषण करून कुरुपता दिसल्यास त्यावर कोणत्याही दडपणाला बळी न पडता प्रहार करणे म्हणजे पत्रकारिता. अर्णव गोस्वामी ची पत्रकारिता या निकषावर उतरत नाही

यावेळी बोलतांना शरद जावडेकर म्हणाले की, एका बाजूला विचार आणि एका बाजूला कृती असे समीकरण चालणार नाही. या दोन्ही प्रक्रिया समांतर चालल्या पाहिजे. हमीद दलवाई यांची भाषणे प्रत्यक्ष ऐकायला मिळाली म्हणून हिंदू-मुस्लिम या प्रश्नाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळाली. क्रांती होण्यासाठी क्रांतीकारी विचार लागतो. अन्यथा केवळ प्रतिक्रिया देऊन काहीही साध्य होत नाही. प्रतिक्रीया केवळ एक टप्पा होतो. वैचारिक मत भिन्नता ठेवून एकमेकांशी वैचारिक चर्चा करणारी व्यक्तिमत्वे आता काळाच्या पडद्याआड गेली. ‘पुरोगामी जनगर्जना’ हा दिवाळी अंक मात्र सातत्याने वैचारिक चळवऴीत योगदान देत आहे. जागतिक स्तरावर तरुणांमध्ये समाजवादाविषयी आकर्षण आहे, हेच अमेरिकेतील सत्तांतरावरून सिद्ध होत आहे. निवडणुकीचे मुद्दे बदलले असून हाताला काम, नोकरी,रोजगार या मुद्यांभोवती निवडणुका रिंगण घालत आहेत. भारतातील बिहारचा निवडणूक निकाल आणि अमेरिकेतील सत्तांतर हे समाजवादी चळवळीच्या दृष्टीने आशेचा किरण आहे. हे बदलाचे संकेत आहेत. समाजवाद आणि समाजवादी विचार काळाच्या कसोटीवर उतरुन तोच सर्वांना तारेल, यात शंका नाही.

सम्राट शिरवळकर यांनी ‘पुरोगामी जनगर्जना’ या दिवाळी अंकाचा धावता आढावा घेतला. प्रमोद दळवी यांनी सुत्रसंचलन केले, तर वर्षा गुप्ते यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: