येत्या दिवाळीत ‘झी टीव्ही’वरील सर्वात लोकप्रिय कलाकार साजरे करणार अभी-प्रज्ञाचे पुनर्मिलन!

दिव्यांचा उत्सव असलेला दीपावली हा सण आता उंबरठ्यावर येऊन ठेपला असून सर्वजण तो साजरा करण्याच्या तयारीला लागले आहेत. यंदा कोरोना विषाणूच्या साथीने आपल्या सर्वांसमोरच अनोखी आव्हाने उभी केली असली, तरी दिवाळीने आशेचा एक किरण दाखविला आहे. आपल्या प्रेक्षकांना एक आनंदाचा सुखद धक्का देण्यासाठी ‘झी टीव्ही’ वाहिनीने दिवाळीच्या दिवशी, 14 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 आणि रात्री 9.00 वाजता ‘कुमकुम भाग्य’चा तीन तासांचा एक विशेष भाग प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभू राम आणि सीता हे वनवास संपवून पुन्हा अयोध्येस परतल्याप्रीत्यर्थ दिवाळी हा सण साजरा केला जातो. आता ‘कुमकुम भाग्य’चे प्रेक्षकही प्रज्ञा ही अभीच्या घरी कधी परत जाणार, याची श्वास रोधून वाट पाहात आहेत. प्रेक्षकांच्या टीव्हीवरील या सर्वात लोकप्रिय जोडीसाठी दिवाळीचा उत्सव ही नवी सुरुवात असेल. या भागात दादींकडून प्रज्ञाचे वधूप्रमाणे स्वागत केलेले पाहायला मिळेल, तसेच त्यानंतर अभी आणि प्रज्ञा हे दिवाळीचे रीतीरिवाज एकत्रितपणे साजरे करताना दिसतील. अभीने दिवाळीचा उत्सव आपल्या घरी साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने या मालिकेच्या रंजकतेचा दर्जा द्विगुणित झाला असून या समारंभात या वाहिनीवरील करण-प्रीता, रणवीर-प्राची, छोटी गुड्डन-अगस्त्य आणि ऋषभ-सृष्टी या सर्व लोकप्रिय जोड्याही सहभागी होणार आहेत. आलियाकडून (रेहना पंडित) अभी-प्रज्ञाच्या जीवनातील या नव्या आरंभात खोडा घालण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा या मालिकेच्या कथानकाला नवी कलाटणी मिळेल. तसेच यावेळी या सर्व कलाकारांकडून काही अप्रतिम कामगिरी पाहायला मिळेल.

या विशेष भागात उत्सवकाळाचा जोश आणि उत्साह तसेच नाट्यमयता आणि प्रणय यांची रेलचेल असेल. त्याशिवाय शब्बीर अहलुवालिया, श्रुती झा, धीरज धूपर, श्रध्दा आर्य, कृष्ण कौल, मुग्धा चापेकर, सावी ठाकूर, कनिका मान, मनीत जौरा आणि अंजुम फकीह यांच्यासारखे लोकप्रिय कलाकार आपल्या नृत्य-गायनाने या जल्लोषाचा आनंद कितीतरीपट अधिक वाढवितील. त्यांना अविनाश मिश्रा, वृशिका मेहता, क्रिस्टल डिसुझा, दीपिका सिंह, सुरभी ज्योती हे कलाकार आणि दीपाली बोरकर व व्ही अनबीटेबल या नृत्यगटाचीही साथ लाभेल.

या विशेष जल्लोषाची सुरुवात अभीच्या घरात सुरभी ज्योतीच्या अप्रतिम नृत्याने होईल. धीरज- श्रध्दा, शब्बीर- सृष्टी आणि कृष्ण- मुग्धा या जोड्यांकडून सादर झालेल्या रोमॅण्टिक नृत्यनाट्याने प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढणार आहे. ‘कुमकुम भाग्य’मध्ये प्रज्ञाची भूमिका रंगविणारी श्रृती झा हिने या विशेष भागाबद्दल सांगितले, “आमच्या मालिकेच्या या विशेष भागाचं चित्रीकरण करताना मी विलक्षण उत्साहात होते. त्यात प्रज्ञा ही अभीच्या घरी परतते आणि मग त्या घरात दीपावलीचा उत्सव अतिशय भव्य प्रमाणात साजरा केला जातो. मी बर्‍्याच महिन्यांनंतर संपूर्ण झी कुटुंब तसंच कुमकुमचं कुटुंब यांच्याबरोबर एकत्रपणे चित्रीकरण करीत होते. ते सर्व होत असताना मला असं वाटत होतं की मी माझ्या घरी परतले आहे आणि माझे कुटुंबीय माझं प्रेमाने स्वागत करीत आहेत. अभी आणि प्रज्ञा यांच्या या पुनर्मिलनाच्या भागात प्रेक्षकांना काही आश्चर्याचे धक्केही बसणार आहेत.”

या विशेष भागात जल्लोषाचा प्रारंभ करणारी सुरभी ज्योती म्हणाली, “अभीच्या घरी प्रज्ञा परतल्यावर तिथे होणार्‍्या जल्लोषपूर्ण कार्यक्रमाचा प्रारंभ मी करणार आहे. माझ्यासाठी दिवाळी म्हणजे नव्या गोष्टींची सुरुवात आहे. ‘कुमकुम भाग्य’च्या कथेला मिळणार्‍्या कलाटणीमुळे तिथेही नवी सुरुवात होणार आहे. या विशेष भागाचं चित्रीकरण म्हणजे जणू घरातीलच एक कार्य होतं आणि मी त्याचा पुरेपूर आनंद लुटला. मला त्या भागात नृत्य करताना पाहून माझे चाहते नक्कीच खुश होतील.”

Leave a Reply

%d bloggers like this: