ऋतुजा जुन्नरकरला प्रोत्साहित करण्यासाठी सुधा चंद्रन आली इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये


सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर हा छोट्या पडद्यावरचा सध्याचा सर्वात लोकप्रिय शो आहे. जसजसा शो अंतिम फेरीकडे वाटचाल करत आहे, तशी इंडियाज बेस्ट डान्सर हा किताब जिंकण्यासाठीची स्पर्धकांमधली चुरस आणखी वाढते आहे. पुण्याच्या ऋतुजा जुन्नरकरने ऋषिकेशच्या अमान शाह बरोबर एक अप्रतिम परफॉर्मन्स दिला, तो पाहून परीक्षक मंत्रमुग्ध झाले आणि ऋतुजा आणि अमान यांच्यात कोण अधिक उजवे होते हे त्यांना ठरवता येईना.

या परफॉर्मन्सच्या आधी ऋतुजा जुन्नरकरला सुधा चंद्रनने तिच्यासाठी काही सर्प्राइज योजले आहे, याची जराही कल्पना नव्हती. लहान आणि मोठ्या पडद्यावर लक्षणीय कामगिरी करणारी सुधा चंद्रन फक्त ऋतुजाला प्रत्यक्ष डान्स करताना बघायला आणि तिला पाठिंबा द्यायला या कार्यक्रमात आली होती. ऋतुजाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना आणि एवढी मोठी व्यक्ती केवळ आपल्यासाठी इथे आली आहे या जाणिवेने ती भारावून गेली.

ऋतुजा आणि अमान यांच्यातली स्पर्धा अटीतटीची होती. त्यांच्या सोलो आणि एकत्र डान्समधल्या मूव्ह्ज पाहून परीक्षक थक्क झाले. गीता कपूर म्हणाली, “ऋतुजा, या सेटवर तुला नवीन अवतार मिळाला आहे, जो अपेक्षित असतो. आणि हेच मला तुझ्याबद्दल आवडते. अमान मला प्रत्येक वेळी धक्का देतो. हा असा स्पर्धक आहे जो अगदी जीव ओतून परफॉर्म करतो. तुमच्यातून एकाची निवड करणे खूप अवघड होते.” मलाइका म्हणाली, “मला इतकी मजा आली की मला उभे होऊन स्पर्धकांसाठी टाळ्या वाजवण्याची इच्छा झाली होती पण मी स्वतःला आवरले. ऋतुजा मंचावर अफाट असते. ती कॅमेर्‍याशी, संगीताशी आणि हावभावांशी खेळत होती. अमान हा माझ्यासाठी खास आहे, कारण तो अगदी मुक्तपणे नाचतो.”

त्यांचा परफॉर्मन्स पाहून सुधा चंद्रन थक्क झाली. ती म्हणाली, “इथे आलेला प्रत्येक स्पर्धक वेगळ्या राज्यातून आला आहे आणि इथवर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. अशी प्रतिभा पाहिली की कधी कधी मला वाटते की, यांच्या तुलनेत आपण आपल्या आयुष्यात किती कमी साध्य केले आहे. किंबहुना, हा शो पाहून मी प्रोत्साहित आणि प्रेरित होते. परीक्षकांच्या टिप्पण्या देखील मार्मिक असतात. मी हे विशेष नमूद करीन की मला टेरेन्स सरांच्या टिप्पण्या खूप आवडतात. ते ज्या छान पद्धतीने नेमकेपणाने मार्मिक अभिप्राय देतात, तसे करणे सोपे नाही. त्या अभिप्रायामुळे स्पर्धकांना देखील हे बरोबर समजते की, कोणत्या बाबतीत त्यांनी अधिक मेहनत करण्याची गरज आहे. ऋतुजा जबरदस्त आहे. आणि तुला शब्दांच्या पलीकडला भाव कसा व्यक्त करावा हे माहीत आहे. एका शास्त्रीय नृत्यांगनेने या शो मध्ये इतका लांबचा पल्ला गाठला आहे, याचा मला आनंद वाटतो आणि अंतिम फेरीत तू पोहोचशील अशीही आशा मला वाटते.”

त्यानंतर परीक्षकांनी सुधा चंद्रनला ऋतुजासोबत  मंचावर जाण्यास विनंती केली. सुधा चंद्रनने ऋतुजा सोबत ‘सलाम-ए-इश्क मेरी जान’ गाण्यावर डान्स केला. मलाइका म्हणाली, “सुधाजी माझी नजर तुमच्यावरून हटत नव्हती, ती तुमच्यावर खिळून राहिली होती.” सुधा चंद्रननी शोमध्ये सर्व स्पर्धकांना सकारात्मक आणि प्रोत्साहित करणार्‍या गोष्टी सांगितल्या, त्यामुळे सर्व आनंदले.

Leave a Reply

%d bloggers like this: