Thursday, June 18, 2026
Business

नफा टिकवण्यासाठी येस बँक रिटेल विकासावर लक्ष केंद्रित करणार – प्रशांत कुमार

तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करून रिटेल ग्राहकवर्ग आणि पर्यायाने विकासाला चालना देण्याची योजना येस बँकेने आखली आहे. बँकेने नुकतीच आर्थिक कामगिरीमधे सुधारणा नोंदवली असून आरबीआयला पूर्ण पैसे आगाऊ भरूनही बँकेच्या ठेवींमधे वाढ झाली आहे.

येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी बँकेची आर्थिक स्थिती उंचावण्याच्या हेतूने लक्ष केंद्रित करण्यासाठी चार कार्यक्षेत्रे ठरवली आहेत.

‘रिटेल ग्राहकवर्ग वाढवण्याला येस बँकेचे पहिले प्राधान्य असेल. गेल्या महिन्यात आम्ही 60,000 खाती सुरू केली आणि डिसेंबर- जानेवारीपर्यंत आम्ही प्रती महिना 100,000 खात्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे आमचा रिटेल ग्राहकवर्ग वाढेल, शिवाय बँकेवरील विश्वास वाढीस लागेल,’ असे येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले.

बँकेने नुकतेच आरबीआयच्या स्पेशल लिक्विडीटी फॅसिलिटीचे 50,000 कोटी रुपये भरले असून जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 129 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. तिमाही ते तिमाही पातळीवर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 3.4 टक्क्यांनी वाढऊन 1973 कोटी रुपयांवर गेले आहे. त्याशिवाय बँकेने फर्दर पब्लिक ऑफरिंगद्वारे (एफपीओ) यशस्वीपणे 15,000 कोटी रुपये उभारले आहेत.

जास्तीत जास्त रिटेल, एमएसएमई आणि वैयक्तिक कर्ज देण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही श्री. कुमार म्हणाले.

‘यापूर्वी कॉर्पोरेट कर्जावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात होता. आता आम्ही आमचा रिटेल आणि एमएसएमई पोर्टफोलिओ विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. वाहन, गृह आणि एमएसएमई कर्जांना चालना मिळाली आहे. अशाप्रकारच्या मागणीसाठी 10,000 कोटी रुपये राखीव ठेवून या कृतीला चालना देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बँकेने आपल्या कर्ज प्रकारात बदल आणण्याचे ठरवले असून कॉर्पोरेट शेयर 40 टक्के आहे, तर नजीकच्या काळात रिटेल व एमएसएमईमधे वाढ करून ते प्रमाण 60 टक्क्यांवर आणण्याचे ठरवले आहे,’ असेही कुमार म्हणाले.

तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करण्याच्या बँकेच्या प्रयत्नांविषयी ते म्हणाले, ‘हे आमचे बलस्थान आहे. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना अशाप्रकारच्या सेवा विशेषतः सध्याच्या सुरक्षित अंतर राखण्याच्या काळात वैयक्तिक सेवा पुरवत आहोत. लॉकडाउनदरम्यान या सेवा अतिशय उपयुक्त ठरल्या. अशाप्रकारच्या सेवांचे आमच्या ग्राहकांनी, विशेषतः एनआरआय ग्राहकांनी खूप कौतुक केले आहे. आम्ही भविष्यातही अशा प्रकारच्या सेवांवर भर देणार आहोत. इतर मोठ्या स्पर्धकांच्या तुलनेत या सेवा जास्त वेगळा अनुभव देतात.’

त्याशिवाय, कुमार यांनी तंत्रज्ञानावर आधारित सेवांमुळे बँकेच्या बचतीत व पर्यायाने एकंदर आर्थिक स्थिती सुधारणा झाल्याकडे लक्ष वेधले. त्याशिवाय कुमार यांनी देशातील आर्थिक स्थितीचे पुनरूज्जीवन होईल व त्याच्या मदतीने बँकेच्या भविष्यालाही चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading