रेंजहिल्स येथील पोलीस चौकीमागील गार्डनची दुरवस्था

पिंपरी, दि. 4 – खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील रेंजहिल्स येथील पोलीस चौकीमागील गार्डनची दुरवस्था झाली असून, पावसामुळे येथे जंगलासारखी परिस्थिती झाली आहे. या गार्डनची दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड ब्लॉक उपाध्यक्ष सुजीत मस्के आणि वॉर्ड क्रमांक 6 चे अध्यक्ष सुमीत कदम यांनी निवेदनाद्वारे खडकी छावणी परिषदेकडे केली आहे.       

नागरिकांच्या साेयीसाठी प्रशासनाच्या वतीने लाखाे रुपये खर्च करून हे उद्यान साकारण्यात आले आहे. मात्र, या उद्यानाच्या देखभालीकडे कॅन्टोन्मेंट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. उद्यानाला  टवाळखाेरांचा अड्डा असे स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत तक्रारी वाढत असतानाही दुरुस्तीला मुहूर्त लागत नसल्याची सद्यस्थिती आहे. माेठा गाजावाजा करत नागरिकांच्या साेयीच्या उद्देशाने हे उद्यान साकारण्यात आलेे हाेते. मात्र, इथल्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कचऱ्याचे साम्राज्य, पसरलेली दुर्गंधी, लाखाे रुपये खर्चून साकारलेली  झालेली तुटफूट अशी माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे, असे सुजीत म्हस्के यांनी सांगितले.          

या उद्यानातील खेळणी, बसण्याची बाके, पाण्यासाठी काढलेले बोअरवेल नादुरुस्त व गंजलेल्या अवस्थेत असून, गेल्या पाच वर्षापासून नागरिकांना व बालगोपाळांना या उद्यानाचा लाभ घेता येत नाही. गार्डन टाईप 4 या ठिकाणच्या उद्यानात लाखो रुपयांचे जिम साहित्य भंगार अवस्थेत पडलेले दिसून येत आहे. उद्यानातील साफसफाई अत्यावश्यक बनली आहे, असे सुजीत म्हस्के यांनी सांगितले.        

बोर्डाने ज्येष्ठ नागरिकांसाठी, मुलांसाठी खेळणी उपलब्ध करून द्यावी व व्यायामासाठी ओपन जिम साहित्य बनवून द्यावे, जेणेकरून या भागातील नागरिकांना उद्यानाचा लाभ घेता येईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.          

या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार केले जात असल्याने गुन्हेगारी घटनांमध्ये देखील वाढ हाेऊ लागली आहे. या प्रकारांमुळे लाखाे रुपयांचा खर्च वाया गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत लाेकप्रतिनिधींसह खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतरही काेणत्याही ठाेस उपाययाेजना करण्यात न आल्याने बोर्डाच्या कारभाराबाबत सुजीत म्हस्के यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.            कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या साैंदर्यीकरणात भर टाकणाऱ्या या उद्यानाच्या देखभालीबाबत अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन या उद्यानाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: