Monday, June 22, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRATOP NEWS

चित्रपटगृह, नाट्यगृहांना राज्यसरकारची परवानगी!

मुंबई, दि. ४ – राज्यात मिशन बिगीन अंतर्गत टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या गोष्टी सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्य सरकारने आता सगळ्यांना प्रतिक्षा अखेर संपवत सिनेमागृह आणि नाट्यगृहांना परवानगी दिली आहे. ५० टक्के क्षमतेने ही सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याची मुभा देण्यात आली असून यासाठी वेगळी नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासोबतच नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच कंटेनमेंट झोन वगळता योगा क्लासेस, बॅडमिंटन, टेनिस खेळ सुरू करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. अनलॉकसंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीमध्ये ही परवानगी देण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती देताना असे म्हटले आहे की, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील.

प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुनश्च सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शूटिंग सारख्या इनडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटेशनसंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर पाच नोव्हेंबरपासून मुभा देण्यात येत आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स यांनाही ५० टक्के आसन व्यवस्था पालन करण्याच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठीही अनुमती देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्यपदार्थांना परवानगी नसेल. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील.

मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading