बँक ऑफ बडोदाचे अग्रगण्य पाऊल, कर्मचारी सहाय्य कार्यक्रम केला सुरू

मुंबई, दि. 4 –  भारतातील एक महत्त्वाची सरकारी बॅंक असलेल्या ‘बँक ऑफ बडोदा’ने, आता एक नवीन कर्मचारी केंद्रित उपक्रम म्हणजे ‘कर्मचारी सहाय्य कार्यक्रम’ सुरू केला आहे. अनेक नवीन संकल्पना, पद्धती आणि उपक्रम राबविण्यात ही बॅंक नेहमीच अग्रेसर असते.

कर्मचार्‍यांना त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशन करणे व योग्य तो सल्ला देणे हे या कर्मचारी सहाय्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. काम करण्याच्या ठिकाणी समुपदेशन करण्याचे महत्त्व ओळखून बॅंकेने कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेण्याचे आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे हे पहिले पाऊल उचलले आहे. याकरीता बँकेने मुंबई विभागात आणि कॉर्पोरेट कार्यालयात प्रयोगिक तत्वावर हा समुपदेशनाचा प्रकल्प राबविला आहे. इएपी इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात वैयक्तिक समुपदेशनाव्यतिरिक्त तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मदतीच्या अनेकविध मार्गांचा समावेश करण्यात करण्यात आला आहे.

‘’सध्याच्या काळात मानसिक ताण व भावनिक मुद्दे यांच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. अशावेळी त्यांना कामाच्या ठिकाणी समुपदेशन मिळणे यास मोठे महत्त्व आहे’’, असे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की विशेष सेवा पुरविणाऱ्या कंपनीशी करार करून बॅंकेने दिलेली ही समुपदेशन सेवा अगदी सुरक्षित, निर्विवाद व अत्यंत गोपनीय आहे. कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना ती 24/7 उपलब्ध आहे. 

“आमच्या बँकेत कर्मचारी सहाय्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करून कर्मचार्‍यांची भावनिक सुदृढता वाढविण्याचे आमचे ध्येय आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे मनोबल वाढून बॅंकेत आनंदी व सकारात्मक कामाचे वातावरण निर्माण होईल आणि उत्पादकतेवर सकारात्मक परिणाम होईल,’’ असे  बॅंकेचे कार्यकारी संचालक एस. एल. जैन म्हणाले.

सरव्यवस्थापक (एचआरएम) प्रकाश वीर राठी यांनी सांगितले, “बँकेचे सुमारे 60 टक्के कर्मचारी 18 ते 35 या वयोगटातील आहेत. त्यांना इतर सहकाऱ्यांचा दबाव, कारकिर्दीतील समस्या, महत्वाकांक्षांचे प्रश्न, नातेसंबंधांतील तणाव, अॅडजस्टमेंटची मानसिकता इत्यादींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या समुपदेशनातून भावनिक चिंता निवारण्यासाठी त्यांना वेळेवर मदत मिळणे शक्य होईल.”

बँक ऑफ बडोदाने घेतलेला हा एक अग्रगण्य असा मनुष्यबळ विकासाचा उपक्रम आहे. कर्मचार्‍यांचे भावनिक आरोग्य जोपासण्यासाठी व त्यांच्यात गुंतवणूक करण्यासाठी त्यातून बरेच काम केले जाईल.

Leave a Reply

%d bloggers like this: