शत्रूला पराभूत करण्यासाठी ‘सरप्राईज अ‍ॅटॅक’ गरजेचा – ले. जनरल राजेंंद्र निंभोरकर (निवृत्त)

पुणे : कोणत्याही लढाईत शत्रूला पराभूत करण्यासाठी सरप्राईज अ‍ॅटॅक गरजेचा आहे. शत्रूला कोणतीही पूर्वकल्पना न देता आक्रमण केले तर बेसावध शत्रूला नमविणे शक्य होते. माझ्या कारकिर्दीत अनेकदा अशा लढाईचा मी भाग होतो. दुर्गम भागातील लढाई अतिशय अवघड असते. अशावेळी सैनिकांच्या सहनशक्तीचा कस लागतो. सर्जिकल स्ट्राईकमध्ये सरकारचा सपोर्ट असल्याने सर्जिकल स्ट्राईक करणे सोपे झाले, असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी व्यक्त केले. 
सैनिक मित्र परिवाराच्यावतीने विजयादशमीनिमित्त देशासाठी प्राणांची बाजी लावणारे पराक्रमी सेनाधिकारी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांचा विशेष सन्मान जनता बँकेचे चेअरमन अभय माटे यांच्या हस्ते एनआयबीएम रस्त्यावरील  निंभोरकर यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी राजेंद्र निभोंरकर यांच्या पत्नी शीला निंभोरकर, पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक किरण पाटोळे, विष्णू ठाकूर, मनोज हेंद्रे, योगिनी पाळंदे, कल्याणी सराफ, अशोक चिंबळकर, विक्रांत मोहिते, संदीप ढवळे, आनंद सराफ, पराग ठाकूर, भोला वांजळे आदी उपस्थित होते. पुणेरी पगडी, गणेशाची मूर्ती, तिरंगी उपरणे, मिठाई त्यांना भेट देण्यात आली. तसेच महिला कार्यकर्त्यांनी यावेळी निंभोरकर यांना सपत्निक औक्षण केले. उपक्रमाचे यंदा २२ वे वर्ष होते. 
अभय माटे म्हणाले, सैनिकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी या उपक्रमात सहभागी झालो. सैनिकांकडून सामान्य जनतेने प्रेरणा घेण्यासाठी तसेच त्यांचे जीवन कसे असते हे समजण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. आम्ही देखील सैनिकांचे कार्य सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले. 
आनंद सराफ म्हणाले, जमिन आणि मातृभूमी यातील फरक जाणून घेण्यासाठी सेनाधिकाºयांसोबत विजयादशमीच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सामान्य जनतेच्या मनात सैनिकांबद्दल असलेली भावना या माध्यमातून व्यक्त केली जाते. सैनिकाच्या मागे त्याचे घर चालविणे ही दुसरी लढाई असते. त्यामुळे त्याच्या पत्नीचा देखील सन्मान गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: