दुसर्‍याचे सुख ओरबाडून आनंदी होता येत नाही;अभयकुमार सरदार यांचे प्रतिपादन

पुणे : आपल्या सर्वांचे जगणे हे सामुदायिक- एकजिनसी जगणे आहे. आपण या सर्व विश्वाच्या जगण्यामधील एक अविभाज्य घटक आहोत. आपण त्यापासून वेगळे असू शकत नाही; होऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन जगल्यास गुरुतत्त्वाच्या संकल्प संकल्पनेप्रमाणे आपले जगणे होते आणि या सृष्टीचा संपूर्ण तोल सावरला जातो. आपले जगणे आपल्याला तसेच इतर विश्वघटकांनाही सुखावह होते. आपल्या आनंदात इतरांनाही आनंद मिळाला पाहिजे, तोच खरा आनंद. आपल्या सुखी होण्यात दुसर्‍यालाही सुख मिळाले तर तेच खरे सुख. दुसर्‍याचे सुख-आनंद ओरबाडून आपण सुखी-आनंदी होऊ शकत नाही, हे गुरुतत्त्वाचे सर्वात मोठे तत्त्वज्ञान आहे, हे समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन गुरुतत्त्वयोग तत्त्वप्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी केले.
दसर्‍यानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात गुरुतत्त्वयोग संस्थेच्या साधकांशी सरदार यांनी संवाद साधला. या वेळी साधकांनी विचारलेल्या शंकांचेही त्यांनी निरसन केले.
सरदार म्हणाले, सृष्टीत काही असमतोल निर्माण झाल्यास निसर्गातील सर्व घटकांकडून समतोल साधण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातो. आपण निसर्गातील सर्व घटकांची भावनेने परिपूर्ण अशा शब्दांत क्षमा मागितल्यास आपले शब्द जरी समजले नाही तरी आपल्या भावभावनांमधून, कृतीतून काय म्हणायचे आहे हे त्यांना निश्चित समजते.
सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण सामुदायिक जीवन विस्कटलेले आहे, आपली स्थिती कोंडल्यासारखी झाली आहे. यातून बाहेर पडायचे असल्यास गुरुतत्त्व तत्त्वज्ञानाचा अंगिकार केला पाहिजे. सध्याच्या नकारात्मक परिस्थितीतून आपण बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाजजीवन सुरळीत होण्यासाठी ज्ञानसाधनेचा अवलंब करत असताना विज्ञानाची-शास्त्राची जोडही तितकीच महत्त्वाची आहे. साधना, साधक आणि साध्य एकत्र येणे महत्त्वाचे आहे. आपण आपली योग्य ती काळजी घेतल्यास आपोआपच दुसर्‍याचीही काळजी घेतली जाते आणि प्रश्न आटोक्यात येतात.
निराशा ही आपली सर्वात मोठी वैरी आहे. निराशेने ग्रासले गेल्यास आपण परिस्थितीपुढे हतबल होतो. ही स्थिती टाळण्यासाठी आनंदी-सकारात्मक राहा, काळजी करू नका, काळजी घ्या, तणावमुक्त राहा दुसर्‍याला आनंद द्या असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रास्ताविक गुरुतत्त्वयोग संस्थेच्या विश्वस्त तेजा दिवाण यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: