दगडूशेठ दत्तमंदिरातर्फे देहविक्रिय करणाऱ्या महिलांचा सन्मान

पुणे :  कोरोनासारख्या महामारीमुळे देशावर आर्थिक परिस्थिती ओढावली असताना याचा सामना समाजातील सर्वांनाच करावा लागत आहे. त्यात बुधवार पेठेतील देहविक्री करणा-या महिलांवर हलाखीची परिस्थिती ओढावली आहे. या महिलांना मदतीचा हात देत बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्यावतीने नवरात्र उत्सवापर्यंत अन्नदान करण्यात आले. तसेच नवरात्रीच्या निमित्ताने बुधवार पेठ वस्तीतील १११ महिलांचा सन्मान करण्यात आला. 
शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांच्या हस्ते साडीचोळी देऊन प्रातिनिधीक स्वरुपात ९ देहविक्री करणा-या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वस्तीतील सामाजिक कार्यकर्त्या आनंदलक्ष्मी कैलासन, मनिषा निंबाळकर, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, हनुमंत शिंदे, सुरेश कांबळे, आनंद सागरे, मंदिराचे व्यवस्थापक विजय पाचंगे आदी उपस्थित होते.   
तेजस्वी पाटील म्हणाल्या, वेश्यावस्तीत काम करणाºया महिला देखील आपल्या समाजाचा एक घटक आहेत. या महिलांवर लॉकडाऊनच्या काळात हलाखीची परिस्थिती ओढावली होती. दत्तमंदिर विश्वस्त मंडळ आणि शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या मदतीने वस्तीमध्ये त्यांना विविध प्रकारे सहाय्य व अन्नदान आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत संयमाने वागून या परिस्थिीचा सामना केला आहे. 
अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, कोरोना महामारीमुळे ओढावलेल्या परिस्थितीचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे. याकाळात ट्रस्टतर्फे या वस्तीतील दररोज ३०० महिलांना लॉकडाऊनपासून ते नवरात्र उत्सवापर्यंत जेवण देण्यात येत होते. या अन्नदान कार्याचा समारोप नवरात्र उत्सवात करण्यात आला. तसेच येथील १११ महिलांचा साडीचोळी देवून देखील सन्मान करण्यात आला. 

Leave a Reply

%d bloggers like this: