विश्व हिंदू परिषदेचा शंख-ढोल नाद; महाराष्ट्रातील मंदिरे त्वरीत उघडण्याचे केले आवाहन

पुणे : आहात आपण खूपच महान, चालू केले मदिरापान… चालू दे तुमचे राजकारण, भक्तांना का त्रास विनाकारण… राखू आम्ही सामाजिक भान, उघडा आमचे श्रद्धास्थान… अशा घोषणा देत मागण्यांचे फलक हातात घेऊन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मंडई गणपती मंदिरासमोर शंख व ढोल-ताशाचा निनाद करुन सरकारला जाग यावी आणि मंदिरे लवकर उघडावी, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली. 
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग राऊत, विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, मंदिर संपर्क प्रमुख मनोहर ओक, वसंत रणपिसे, सतिश कुलकर्णी, गणेश वनारसे, श्रीकांत चिल्लाळ यांसह कार्यकर्ते सहभागी झाले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले. मंडई गणपतीसह तुळजाभवानी मंदिर सातववाडी हडपसर येथील मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. सरकारने मंदिरे त्वरीत उघडली नाहीत, तर परिषदेतर्फे राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 
पांडुरंग राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची व्यवस्था होत असते, हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प  झाले आहे. किमान आता तरी सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा. कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा व त्वरीत सर्व देवालये  भक्तांसाठी खुली करावीत. गेली चार महिने टप्प्याटप्प्याने का होईना सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. सर्व बाजारपेठा, भाजीबाजार, मॉल,  सर्व दुकाने, बँका, सर्व खाजगी सरकारी कार्यालय, कंपन्या, कारखाने सगळेच व्यवस्थित सुरू आहे. हे सगळे सुरू आहे तर मंदिरांवर सरकार रोष  का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 
किशोर चव्हाण म्हणाले, सध्याच्या काळात मंदिर ही तर समाजाच्या अधिक गरजेची झाली आहेत. आर्थिक, मानसिक व भावनिकदृश्ष्टया अस्थिर  झालेल्या माणसाला देवाच्या दर्शनाने अधिक उमेदीने जगण्याचे बळ मिळते. मानसिक व भावनिक आधार मिळतो. हिंदू समाजाच्या स्थैर्याची मंदिरे मुख्य केंद्र आहेत. 
मनोहर ओक म्हणाले, मंदिरातील देवते वरील श्रद्धेने सदाचार, संयम व नीतिमत्तेचे  आचरण हिंदू समाजाचे होत असते.  मंदिरांवर अनेक गावांची, धर्मस्थानांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. महाराष्ट्र ही जागृत धर्मस्थानांची भूमी आहे. मंदिरांच्या आश्रयाने असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. गुरव-पुजारी-पुरोहित या वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. परिषदेने महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सर्व जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना यापूर्वी याबाबतची निवेदने दिली आहेत. आता हिंदू समाजाचा संयम संपत चालला आहे.  आपल्या श्रद्धेय देवतेचे दर्शन घेता येऊ नये याची वेदना आता वाढत चालली आहे. त्यामुळे त्वरीत मंदिरे उघडण्यात यावी.

Leave a Reply

%d bloggers like this: