टाटा ऑटोकॉम्प साजरा करत आहे रौप्य महोत्सव!

– रतन एन. टाटा यांनी जागवल्या जुन्या आठवणी

पुणे,दि. २४ –  भारतातील आघाडीची ऑटो कॉम्पोनन्ट कंपनी टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सला १७ ऑक्टोबर २०२० रोजी २५ वर्षे पूर्ण झाली.  यानिमित्ताने व्हर्च्युअली आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला जगभरातून १६००० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित होत्या.  यामध्ये कंपनीचे कर्मचारी, भागीदार, ग्राहक, पुरवठादार आणि हितधारकांचा समावेश होता.

यानिमित्ताने आपल्या विशेष संदेशामध्ये टाटा ऑटोकॉम्पचे संस्थापक अध्यक्ष व टाटा ट्रस्ट्सचे चेअरमन श्री. रतन एन. टाटा यांनी सांगितले की त्या काळात नुकत्याच अस्तित्वात आलेल्या ऑटो उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान घेऊन येऊ शकेल अशी वाहनांचे अधिकृत सुटे भाग बनवणारी कंपनी भारतात उभारली जावी हे त्यांचे स्वप्न होते.  भारतात गुंतवणूक करण्यासाठी जागतिक पातळीवरील मोठ्या कंपन्यांना राजी करताना किती आव्हानांचा सामना करावा लागत असे तेही त्यांनी नमूद केले.  वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कंपन्यांसोबत भागीदारी करत श्री. टाटा यांनी टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडची मजबूत मुहूर्तमेढ रोवली.  टाटा सन्सचे चेअरमन श्री. एन. चंद्रशेखरन यांनी टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे आजवरच्या वाटचालीसाठी आणि टाटा समूहामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले.

या विशेष प्रसंगी टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे एमडी श्री. अरविंद गोयल यांनी सांगितले, “गेल्या २५ वर्षात टाटा ऑटोकॉम्प ही एका स्थानिक कंपनीपासून जागतिक कंपनी बनली आहे.  आपले स्वतःचे व्यवसाय आणि आघाडीच्या जागतिक कंपन्यांसोबत भागीदारी करून टाटा ऑटोकॉम्पने आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करवून दिले.”  टाटा ऑटोकॉम्पच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेत असतानाच श्री. गोयल यांनी आवर्जून सांगितले की, समूह अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार सच्चा साधेपणा, योग्य ताळमेळ, प्रमाण यांच्याबरोबरीनेच ग्राहकांच्या मागण्यांबद्दल सहानुभूती, हितधारक व पुरवठादारांसोबत समन्वय आणि कामगिरीला प्रोत्साहन देणारी संस्कृती हा मंत्र सोबत घेऊन आम्ही भविष्यातील वाटचाल करणार आहोत.  अतिशय प्रेरणादायी अशा आपल्या भाषणात श्री. गोयल यांनी सांगितले की, “२०२५ सालापर्यंत ३०० कोटी यूएस डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेली कंपनी बनणे हे आमचे उद्धिष्ट आहे.” 

कंपनीचे अभिनंदन करताना टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे चेअरमन  प्रवीण कडले यांनी सांगितले, “आजवर टाटा ऑटोकॉम्पने आपल्या ग्राहक आणि उत्पादन पोर्टफोलिओमध्ये सातत्याने सुधारणात्मक वाढ केली आहे, त्याचबरोबरीने टाटा बिझनेस एक्सेलेन्स मॉडेलअंतर्गत मजबूत यंत्रणा, प्रक्रिया उभारणीसाठी देखील ही कंपनी गुंतवणूक करत आली आहे.” 

टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स ही कंपनी आज जगभरातील जवळपास सर्व ऑटो ओईएम्सना सेवा व उत्पादने पुरवते.  नव्याने निर्माण होत असलेल्या ईव्ही क्षेत्रासाठी या कंपनीने प्रभावी पोर्टफोलिओ देखील विकसित केला आहे.  संशोधन आणि विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत उत्पादन प्रक्रिया यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत टाटा ऑटोकॉम्प ही ऑटो-कॉम्पोनन्ट उद्योगक्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी बनण्यासाठी सज्ज आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: