fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRATOP NEWS

‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू या’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :-  विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, लढवय्या महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत. कोरोनाच्या संकटातच निसर्गाची अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगडगमता सामोरे जात आहोत. कोरोनाच्या विषाणूला पराजीत करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून विषाणुचाच पाठलाग करून, त्याला रोखण्याचा आपले कोरोना योद्धा प्रय़त्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यांनीच खूप संयम दाखवला आहे. सर्वच धर्मींयानी आपले सण, उत्सव घरीच साजरे केले आहेत. उद्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा उत्सव साजरा करणार आहोत. दसरा संकटावर, वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणुच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे गर्दी न करण्याचे – शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल. अशा प्रय़त्नातूनच आपण कोरोनारुपी रावणाचा नाश करू आणि नव्या जोमाने भरभराटीकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading