अटल बस योजनेमुळे वाहतूक कोंडी कमी होईल – चंद्रकांत पाटील

पीएमपीच्या अटल बस योजनेचा प्रारंभ

पुणे : “केवळ पाच रुपयांत पाच किलोमीटरचा प्रवास या सुविधेमुळे अटल बस योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल. शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन सार्वजनिक बस सेवेला चालना मिळेल,” असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात- पीएमपीएमएलच्या अटल बस सेवा योजनेला आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या प्रांगणात प्रारंभ करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेता धीरज घाटे, आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, पीएमपीचे विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सहसा नफ्यात चालत नाही. मात्र अटल योजनेतील स्वस्त आणि सोयीस्कर सुविधांमुळे पुणेकरांना चांगला पर्याय मिळाला आहे. यामुळे खाजगी वाहनांची गर्दी कमी होऊन शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल.”

अशी आहे अटल बस योजना..
‘अटल’ म्हणजे अलायनिंग ट्रान्झिट ऑन ऑल लेन्स.
शहरातील गर्दीच्या ठिकाणी आणि अरुंद रस्त्यांवर बस सेवा उपलब्ध करून देणारी ही महत्त्वाकांक्षी योजना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अमलात येत आहे. या योजनेचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे दर पाच मिनिटांनी अवघ्या पाच रुपयांत पाच किलोमीटरचा प्रवास प्रवाशांना घडणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील ज्या मार्गांवरून या बसेस धावणार आहेत त्यात प्रामुख्याने नऊ मार्गांचा समावेश असणार आहे. या नऊ मार्गांवरून एकूण 99 बसेस धावणार आहेत.

अटल बस सेवा योजनेंतर्गत पीएमपीएमएलने खास प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे, ते म्हणजे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी – शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बस पोचवण्यासाठी प्रयत्न करणे. याकरिता डेपो टर्मिनल फीडर अंतर्गत प्रवाशांना बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माध्यमातून एकूण 53 मार्गांवर 143 बसेस धावणार आहेत.

फीडर सेवा
बस डेपोपासून आतल्या भागांत राहणारे नागरिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना डेपोपर्यंत पोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांवर पहिल्यांदाच बसेस धावणार आहेत. सर्व बस डेपोचे व्यवस्थापक, चालक, वाहक, प्रवासी यांचे अभिप्राय तसेच स्वयंचलित प्रवास भाडे संकलन प्रणालीचा प्रतिसाद घेऊन मगच या मार्गांचा या योजनेत अंतर्भाव करण्यात आला आहे.

‘अटल’ प्रवासी योजनेत शहराच्या मध्यवर्ती भागात मिडी बस धावतील जेणेकरून जास्त अंतराच्या मार्गावरील बसेसना पूरक अशी बस सेवा पुरवली जाईल. लांब अंतराच्या मार्गावरील बसेसची वारंवारता तुलनेने कमी असते. ती बस निघून गेली की पुन्हा त्याच नंबरची बस येईपर्यंत प्रवाशांना वाट पहावी लागत असे परंतु अटल बस सेवेमुळे त्याच मार्गावर जाणाऱ्या दुसर्‍या पर्यायी तात्काळ उपलब्ध होणार आहेत.

वेळ व पैशाची होणार बचत
आता स्वारगेटपासून पिंपरी-चिंचवडला जाणारी बस निघून गेली तर पुन्हा त्याच बसची वाट पाहण्याची आवश्यकता भासणार नाही. अटल सेवेतील स्वारगेट ते शिवाजीनगर बस पाच मिनिटात मिळेल व त्यातून पाच रुपयांत शिमला ऑफिस, शिवाजीनगर येथे जाता येईल, जेणेकरून तिथे पिंपरी-चिंचवडला जाणाऱ्या इतर अनेक बसेस त्वरित उपलब्ध होतील. यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा तर वाचणार आहेच शिवाय लांब टप्प्याच्या प्रवासाला उभे राहून ताटकळत प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.

अटल प्रवास करू कोरोनाला दूर ठेवू
मध्यवर्ती भागात धावणाऱ्या अटल बसमुळे मोठ्या मार्गावरील एकाच बसला होणारी गर्दी कमी होईल. यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना शारीरिक अंतर राखणे सहज शक्य होणार आहे.

लांब पल्ल्याच्या बसेसना जोडणारा दुवा
मोठ्या मार्गांवर धावणाऱ्या विविध बसेसना पूरक अशी जोडणी करणारी ही बससेवा म्हणजे लांब पल्ल्याच्या बसेसना जोडणारा दुवा ठरणार आहे. अटल योजनेतील बस विशिष्ट रंगाची मिडीबस असल्याने ती लगेच लक्षात येते. ही बस सेवा मोबाईल अॅपद्वारेसुद्धा वापरता येणार आहे. जीपीएस यंत्रणेमुळे धावत्या बसचे ठिकाणही (लाइव्ह लोकेशन) कळू शकणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: